सिधी (मध्य प्रदेश) : प्रवाशांनी भरलेली बस कालव्यात कोसळून झालेल्या अपघातात ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. सिधी जिल्ह्यात रामपूर नैकीन पोलीस ठाण्याजवळ सकाळी ८ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे. मृतांमध्ये बहुसंख्य विद्यार्थी असून सर्व जण एका परीक्षेसाठी सतना येथे जात होते.अपघातग्रस्त बस सिधी येथून सतना येथे जात होती. बसमध्ये ५४ प्रवासी होते. त्यातील बहुसंख्या विद्यार्थी होते. ते ‘एएनएम’ची परीक्षा देण्यासाठी निघाले होते. अपघात घडला त्या ठिकाणी कच्चा आणि अरुंद रस्ता आहे. तेथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस कालव्यात काेसळली. मुख्य मार्गावर वाहतूक कोंडी झाल्यामुळे बसचालकाने हा शॉर्टकट घेतला. तोच त्यांना मृत्यूच्या दारी घेऊन गेला. अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधानांनी मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये तर राज्य सरकारने पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.
शिवरानीने दोघांना वाचविलेबस कालव्यात कोसळल्यानंतर काही स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यापैकी शिवरानी नावाच्या मुलीने प्राणाची चिंता न करता कालव्यात उडी टाकून दोघांना सुखरूप बाहेर काढले. मुख्यमंत्री चौहान यांनी तिच्या शौर्याचे कौतुक केले आहे. तिचा अभिमान असल्याचे ट्विट केले आहे. बस कालव्यात कोसळली त्यावेळी शिवरानी तिच्या भावासोबत जवळच उभी होती.
अमित शहा यांचे कार्यक्रम रद्दअपघातानंतर राज्य सरकारने सर्व महत्त्वाचे कार्यक्रम रद्द केले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या व्हर्च्युअल उपस्थितीत पंतप्रधान आवास योजनेसंबंधीचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला.