उडपी - विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावणारे शिक्षक आपण पाहिले आहेत. काही दिवसांपूर्वीच तामिळनाडूतील एका शिक्षकाच्या बदलीनंतर विद्यार्थ्यांसह अख्ख्या गावाने रडून टाहो फोडल्याचेही आपण पाहिले. आताही, कर्नाटकमधील एका शिक्षकाने विद्यार्थ्यांनी शाळा सोडू नये, यासाठी चक्क बसच विकत घेतली. एवढ्यावरच हे शिक्षक थांबले नाहीत, तर या बसचे ड्रायव्हरही ते स्वत:च बनले आहेत. राजाराम असे या आदर्श शिक्षकाचे नाव आहे.
कर्नाटकच्या बराली या दुर्गम भागातील प्राथमिक शाळेचे शिक्षक राजाराम यांनी विद्यार्थ्यांनी शाळा सोडू नये, यासाठी चक्क बसच खरेदी केली. या शाळेत येण्यासाठी विद्यार्थ्यांना वाहनाची सोय नव्हती. तर खराब रस्ता आणि घरापासून शाळा दूर असल्याने अनेक मुलांनी शाळाच सोडून दिली होती. बराली येथील या प्राथमिक शाळेत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना 3 किमीचा प्रवास पायी करावा लागत होता. गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड राजाराम यांना पाहावत नव्हती. विद्यार्थ्यांनी शाळा सोडून द्यावी, ही बाब विद्यार्थीप्रेमी शिक्षक राजाराम यांच्या मनाला पटणारीही नव्हती. त्यामुळेच राजाराम यांनी आपल्या जुन्या विद्यार्थ्यांच्या मदतीने पैसे जमा करुन बस खरेदी केली. त्यानंतर सुरु झाला शाळेतील विद्यार्थ्यांचे सारथ्य करण्याचा प्रवास. राजाराम यांनी स्वत: या बसच्या ड्रायव्हरची सीट काबीज करत विद्यार्थ्यांना घरातून शाळेत आणि शाळेतून घरी पोहोचविण्याचे काम सुरू केले. बराली आणि या परिसरातील गावातून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पूर्ण करावे, अर्ध्यावरच शाळा सोडू नये म्हणून त्यांनी ही बससेवा सुरू केली आहे. दररोज सकाळी 9.20 वाजता शाळा सुरु होण्यापूर्वी ते स्वत: बस घेऊन विद्यार्थ्यांच्या घरी जातात. तेथून विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन येतात. त्यानंतर शाळेत अध्ययनाचे काम करतात.
मी प्राथमिक शाळेचा शिक्षक असून बससाठी ड्रायव्हरला 7 हजार रुपयांचे दरमहा वेतन देणे, मला परवडणारे नाही. त्यामुळेच मी स्वत: बस चालविण्याचा निर्णय घेतल्याचे राजाराम यांनी सांगितले. तसेच भविष्यात विद्यार्थ्यांना शिक्षणात गोडी निर्माण व्हावी यासाठी त्यांना खेळाचेही प्रशिक्षण देण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यासाठी रनिंग ट्रॅकही बनवायचा असून लवकरच तेही स्वप्न पूर्ण करणार असल्याचे राजाराम यांनी म्हटले. राजाराम यांनी आपल्या कृतीतून आदर्श शिक्षकाचे काम करुन दाखवले आहे. राजाराम हे केवळ गणित आणि विज्ञान शिकवणारेच शिक्षक नाहीत, तर एक उत्तम माणूस व आदर्श शिक्षक असल्याचे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले. एकीकडे महिनाभर शाळेत हजर न राहता पगार उचलणारे शिक्षक याच देशात आहेत. तर शिक्षण हाच धर्म आणि कर्म मानून जगणारे राजाराम यांच्यासारखे आदर्श शिक्षकही याच भारतभूमीतील प्रेरणास्थान आहेत.