अमृतसर : खलिस्तानसमर्थक अमृतपाल सिंगचा १३व्या दिवशीही शोध सुरूच आहे. सध्या होशियारपूर जिल्ह्यातील मार्नियन हे गाव शोधमोहिमेच्या केंद्रस्थानी असून, तेथे मोठ्या प्रमाणात पोलिस आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. शिवाय ‘ड्रोन’ची मदत घेण्यात येत आहे. अमृतपाल सिंग या गावात लपून बसल्याचा दाट संशय आहे.
दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी पाठलाग केल्यानंतर काही संशयित लोक त्यांच्या कार मार्नियन गावाजवळ सोडून पसार झाले होते. अमृतपालसिंग फरार असल्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने हे गाव पोलिसांच्या रडारवर आले आहे. मार्नियन गाव आणि आसपास तैनात केलेली पोलिस वाहनेही तपासत आहेत. याआधी अमृतपाल व त्याचे साथीदार या परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पंजाब पोलिसांनी होशियारपूर गावासह आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबविली होती. (वृत्तसंस्था)
शरणागती पत्करणार?
अमृतसर येथील प्रसिद्ध सुवर्णमंदिर किंवा भटिंडा येथील तख्त श्री दमदमा साहिब या दोन पवित्र स्थळांपैकी एका ठिकाणी माथा टेकवल्यानंतर अमृतपाल सिंग आत्मसमर्पण करू शकतो, अशी वृत्ते आल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अमृतसर, भटिंडा येथील सुरक्षा वाढविली आहे.
३४८ जणांची सुटका
फुटीरवादी अमृतपाल सिंग यांच्याविरोधातील धरपकड मोहिमेदरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या ३६० पैकी ३४८ जणांची सुटका करण्यात आली आहे, असे पंजाब सरकारने अकाल तख्तला कळविले आहे. उर्वरितांनाही लवकरच सोडले जाईल, असा संदेश राज्य सरकारकडून आला आहे, असे अकाल तख्तच्या जत्थेदारांचे स्वीय सचिव जसपाल सिंग यांनी गुरुवारी सांगितले.