नितीन अग्रवाल -नवी दिल्ली : जम्मूत हवाई दलाच्या तळावर झालेला ड्रोन (Drone) हल्ला चिंता वाढवणारा आहे. अशा प्रकारचा तो पहिला हल्ला होता. त्याकडे पाकिस्तानच्या छुप्या युद्धाचा नवा प्रकार म्हणून बघितले जात आहे.
गेल्या काही घटनांनंतर सरकार अशा प्रकारच्या हल्ल्यांबद्दल अनभिज्ञ नव्हते. नुकतेच नागरी उड्डयनमंत्री हरदीप पुरी यांनी संसदेत सांगितले होते कीत्त्वाच्या सुरक्षा संस्थांवर ड्रोन हल्ले रोखण्यासाठी प्रोटोकॉल (एसओपी) निर्देश जारी केले गेले आहेत. मार्च २०२० मध्ये त्यांनी सांगितले होते की, गृहमंत्रालयाच्या निर्देशा अंतर्गत या प्रकारच्या धोकादायक बाबींचा पत्ता शोधण्यासाठी डिजिटल स्काय प्लॅटफॉर्म सुरू केला गेला आहे. अधिकृत दस्तऐवजांनुसार १४ जानेवारी ते ३१ जानेवारी, २०२० दरम्यान देशात १९५५३ ड्रोन डिजिटल स्कायवर नोंदणी केले गेले. त्यातील १,०३८ मोठे ड्रोन होते. राहिलेली नोंदणी १३,७३५ सूक्ष्म ड्रोनची होती.
ड्रोनच्या एका जाणकाराने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, ड्रोन दूर अंतरावरून रिमोटने नियंत्रित केले जाऊ शकते. सामान्यत: ड्रोन कॅमेरा, माइक आणि जीपीएसयुक्त असतात. त्यामुळे त्याच्या ऑपरेटरला त्याचे ठिकाण आणि ऑडिओ, व्हिडिओ मिळतात. अतिरेकी चालत फिरत लक्ष्य करू शकतात. याच कारणामुळे जगात अतिरेकी हल्ले करण्यासाठी ड्रोन वापरत आहेत. विशेष म्हणजे स्फोटात ड्रोनही नष्ट होते.
म्हणून हे शोधणे कठीण होते? की, त्याला कोठून पाठवण्यात आले किंवा त्याचे नियंत्रण कोण करीत होते? ड्रोन लहान आणि कमी उंचीवर उडत असल्यामुळे ते रडारच्या पकडीत येत नाहीत. परिणामी लाइन ऑफ व्हिजन सर्विलन्स तंत्रज्ञानालाही त्याचा पत्ता लागत नाही, असे हा जाणकार म्हणाला.
जम्मूतील तळावर ड्रोनने टाकलेल्या आयईडीमध्ये आरडीएक्स सापडले- नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या जम्मूतील तळावर ड्रोनने बॉम्ब फेकण्यात आले होते. यातील दोन आयईडीमध्ये आरडीएक्स आणि नायट्रेटसह स्फोटक साहित्य आढळले आहे, असे फॉरेन्सिक तज्ज्ञांनी सांगितले.
- आरडीएक्स भारतात उपलब्ध नाही. ते पाकिस्तानमधून मागविण्यात आले होते. या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता हे सिद्ध करण्यास हे पुरावे महत्त्वाचे ठरणार आहे. यातील एक आयईडी आकाराने मोठा आहे. मोठे नुकसान घडवून आणणे हा यामागचा उद्देश होता.