लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भविष्यात दुष्काळी स्थिती ओढावली, तर राज्यात आयपीएलचे सामने आयोजित केले जाणार नाहीत, अशी हमी देण्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) उच्च न्यायालयाला शुक्रवारी नकार दिला. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने दुष्काळी स्थितीत आयपीएलसाठी पाणी न पुरवण्याचे निर्देश, राज्य सरकार व महापालिकेला देण्याचे संकेत दिले आहेत.भविष्यात दुष्काळ पडला, तर राज्यात आयपीएलचे सामने आयोजित करणार नाही, अशी हमी द्या, तरच आम्ही याचिका निकाली काढू, असे न्यायालयाने म्हटले. मात्र, बीसीसीआयने आश्वासन देण्यास नकार दिला. आमचे स्वत:चे स्टेडियम नाही किंवा आम्ही पाणीही पुरवत नाही. त्यामुळे आम्ही असे आश्वासन देऊ शकत नाही, असे बीसीसीआयने न्यायालयाला सांगितले.बीसीसीआयने आश्वासन देण्यास नकार दिल्याने, न्यायालयाने ही याचिका निकाली काढण्यास नकार दिला. तुम्ही (बीसीसीआय) आश्वासन देण्यास नकार देत असाल, तर आम्हीच राज्य सरकार आणि महापालिकेला दुष्काळी स्थितीत आयपीएलसाठी पाणी न पुरवण्याचे निर्देश देतो,’ असे म्हणत न्यायालयाने सुनावणी ३० जूनला ठेवली आहे.एनजीओने घेतली होती न्यायालयात धावगेल्या वर्षी राज्यात दुष्काळ पडूनसुद्धा आयपीएलच्या सामन्यांसाठी पाणी पुरविण्यात आल्याने, एका सामाजिक संस्थेने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर न्यायालयाने आयपीएलचे सामने राज्याबाहेर हलविण्याचा आदेश बीसीसीआयला दिला होता. आता या याचिकेत तथ्य न राहिल्याने, याचिका निकाली काढावी किंवा प्रतिवादी म्हणून बीसीसीआयचे नाव वगळावे, अशी विनंती बीसीसीआयने न्यायालयाला केली. मात्र न्या. अभय ओक व न्या. विभा कंकणवाडी यांनी याचिका निकाली काढण्यास शुक्रवारी स्पष्ट नकार दिला.
दुष्काळी स्थितीत आयपीएल बाद?
By admin | Published: June 24, 2017 3:18 AM