ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. १ - दारु पिऊन गाडी चालवणे हा गुन्हा असताना याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत स्वत:चा आणि दुस-याचा नाहक जीव घेणारा दारुडा चालक हा आत्मघाती दहशतवादीच असल्याचे कोर्टाने म्हटंले आहे. दारु पिऊन गाडी चालवताना दारुडे चालक केवळ स्वत:ला इजा करुन घेत नाही तर ते रस्त्याने जाणा-या निष्पाप लोकांचा जीव घेतात असे सांगत अशा लोकांना आत्मघाती दहशतवादी म्हणने चुकीचे ठरणार नाही असे अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश विरेंद्र भट यांनी एका सुनावणी दरम्यान निर्णय देताना म्हटले. रिक्षाचालक पवन कुमारला दारु पिऊन गाडी चालवल्याबद्दल ट्रायल कोर्टाने २० दिवसाची कारावासाची शिक्षा व २ हजार रुपये दंड ठोठावला होता. परंतू पवन कुमारने या शिक्षेला आव्हान देत शिक्षेविरोधात न्यायालयात धाव घेतली. पवन कुमारने आपल्या याचिकेत म्हटले की, आपण मारेकरी नसून आपल्यावर पहिल्यांदाच गुन्हेगारीचा डाग लागला आहे यासाठी ठोठावण्यात आलेली कारावासाची शिक्षा रद्द करण्यात यावी. पण कोर्टाने ही याचिका फेटाळून लावत दारुडया चालकाला खडे बोल सुनावले. दारू पिऊन गाडी चालवणे म्हणजे केवळ त्याच्या जीवनाची जोखीम नव्हे तर ती रस्त्याने चालणा-या पादचा-याच्या जीवनाची सुध्दा जोखीम आहे. असे सांगत ट्रायल कोर्टाने ठोठावलेली शिक्षा न्यायालयाने कायम ठेवली.
दारुडा चालक हा आत्मघाती दहशतवादीच - कोर्ट
By admin | Published: April 01, 2015 4:38 AM