चंदीगढ : एखाद्याला पिझ्झा वा पुस्तके घरपोच देण्यासाठी ड्रोनचा वापर कसा करता येईल याबाबत आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्या विविध प्रयोग करत असताना पाकिस्तानातून भारतीय हद्दीतील गावांमध्ये अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. पंजाबच्या सीमेलगतच्या गावांत हे प्रकार घडत असल्याची माहिती सीमा सुरक्षा दल (बीएसएफ)च्या गुप्तचर विभागाच्या सूत्रांनी दिली.गुरुदासपूर जिल्ह्यातील गावांमध्ये पाकिस्तानी तस्करांनी ड्रोनच्या माध्यमातून अमली पदार्थ भरलेली प्लास्टिकची पाकिटे पोहचविल्याचे प्रकार अलीकडेच समोर आहेत. पाकिट अडकवलेले ड्रोन २०० मीटर उंचीवरुन उडत सीमा पार करते. हव्या त्या ठिकाणी ते पाकिट टाकून पुन्हा पाकिस्तानात परतते. सीमेपलीकडून याआधी एकदा ड्रोन आल्याचे लक्षात आल्यानंतर बीएसएफचे जवान सतर्क झाले. या ड्रोनचा माग काढण्यात येत असल्याचे लक्षात येताच ते त्वरेने पाकिस्तानात परतले. पाकिस्तानातून भारतात ड्रोन पाठविण्याचा प्रकार चंदिगढ व सहारन येथील सीमाभागात घडले आहेत.एक वरिष्ठ बीएसएफ अधिकारी म्हणाला की, अमली पदार्थ तस्करीसाठी पाकिस्तानने आणखी एक शक्कल लढविली आहे. तेथील प्रशिक्षित स्कूबा डायव्हर्स याची पाकिटे घेऊन सतलज व रावी नदीतून पोहत भारतीय हद्दीत येताच पाकिटे भारतातील हस्तकाच्या ताब्यात देऊन परत जातात. (वृत्तसंस्था)२७० किलो अमली पदार्थ केले जप्तपंजाबमध्ये पाकिस्तानला लागून असलेल्या ५५३ किमी अंतराच्या सीमेची सुरक्षाव्यवस्था बीएसएफकडे सोपविण्यात आली आहे. पंजाबमधील अबोहर, फिरोजपूर, अमृतसर, गुरुदासपूर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची तस्करी होते. २०१७ साली २७० किलो हेरॉइन व अन्य अमली पदार्थांचा साठा तस्करांकडून जप्त केला होता. २०१६ साली हे प्रमाण १८ टक्क्यांनी जास्त आहे.
पाकमधून भारतात ड्रोनद्वारे ड्रग तस्करी, बीएसएफची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 11:27 PM