मुंबई:नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मुंबईतील एका प्रवासी क्रूझ जहाजावर छापा टाकत नारकोटिक्स पार्टीचा भंडाफोड केला. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि सात जणांना या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलं आहे. एमडीएमए, एक्स्टसी, कोकेन, एमडी (मेफेड्रोन) आणि चरस यासारखे अमली पदार्थ शनिवारी संध्याकाळी छाप्यादरम्यान जप्त करण्यात आली, असे एनसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले.
मुंबईतील एनसीबीच्या छाप्यांदरम्यान भारतीय लष्कराने एलओसीजवळ उरी सेक्टरमध्ये 25 ते 30 किलो हेरॉईन आणि इतर ड्रग्ज पकडले आहेत. त्याची किंमत 30 कोटींपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे. संयुक्त सुरक्षा दलाने विशेष कारवाई करताना या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यापूर्वी, एनसीबीने गुजरातमधील रेल्वे स्थानकावरून एक किलो मेथामफेटामाइन बाळगल्याप्रकरणी तीन जणांना अटक केली होती. या नशेची किंमत अंदाजे 1 कोटी रुपये आहे. या सर्व प्रकरणांवरुन देशात पसरलेलं ड्रग्सचं जाळं दिसून येत आहे.
140,000 कोटी रुपयांच्या हिरोइनचा व्यापार
2020 च्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी देशात 140,000 कोटी रुपयांच्या हेरॉईनचा व्यापार झाला होता. देशात 142 ड्रग सिंडिकेट कार्यरत आहेत आणि 2 दशलक्ष व्यसनी लोकं आहेत. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने केलेल्या एका विश्लेषणात ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या ड्रग्सच्या व्यापारामुळे चित्रपट उद्योगांवरही परिणाम झाला आहे.
मोठ्या प्रमाणात ड्रग्सची आयातएनसीबीच्या विश्लेषणानुसार, या सिंडिकेटचे पश्चिम युरोप, कॅनडा, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका आणि पश्चिम आशियातील देशांशी संबंध आहेत. NCB च्या अंदाजानुसार दरवर्षी 360 मेट्रिक टन किरकोळ हेरॉईन आणि सुमारे 36 मेट्रिक टन बल्क हेरॉईनची भारतातील विविध शहरांमध्ये तस्करी केली जाते. आकडेवारीनुसार 2 दशलक्ष व्यसनी दररोज सुमारे 1,000 किलो उच्च दर्जाच्या हेरॉईनचे सेवन करतात.
देशभरातून 74,620 अटक
पंजाब देशात अंमली पदार्थांच्या तस्करीचे केंद्र आहे. गेल्या वर्षी राज्यातून 15,449 लोकांना अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी अटक करण्यात आली होती. 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये NDPS कायद्याअंतर्गत एकूण 74,620 अटक करण्यात आली आहे. गेल्या वर्षी झालेल्या एकूण 18,600 अटकांपैकी 5,299 पंजाबमधील आहेत. देशभरात कार्यरत असलेल्या सिंडिकेटपैकी 25 पंजाब, हिमाचल प्रदेश आणि हरियाणाच्या भागातून कार्यरत आहेत. राजस्थानमध्ये नऊ सिंडिकेट आहेत. एनसीबीच्या विश्लेषणानुसार, केरळ, तामिळनाडू आणि लक्षद्वीपमध्ये सुमारे 10 मोठे सिंडिकेट आहेत.