नवी दिल्ली - भारतात अँटीबायोटिक्स किंवा प्रतिजैविक औषधांचा दुरुपयोग थांबविण्यासाठी केंद्र सरकारने डॉक्टरांसाठी महत्त्वाचे आदेश दिले आहेत. या औषधांचे प्रिस्कीप्शन देताना ‘स्पष्टपणे संकेत’ लिहिणे बंधनकार असल्याचं म्हटलं आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या आरोग्य सेवा महानिदेशालयाने (DGHS) यासंबंधित एक आवाहन केले असून देशातील सर्वच मेडिकल कॉलेज, मेडिकल असोसिएशन्स आणि फार्मासिस्ट असोसिएशन्सच्या डॉक्टरांसाठी पत्र जारी केले आहे.
आरोग्य सेवा महानिदेशक डॉ. अतुल गोयल यांनी १ जानेवारी रोजी लिहिलेली तीन पत्र उपलब्ध आहेत. त्यामध्ये, डीजीएचएसने फार्मासिस्ट (दवाखानों) संघद्वारे ‘फक्त प्रसिद्ध आणि अभ्यासू डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच’ अँटीबायोटिक्स देण्याचे सूचवले आहे. तसेच, इतरत्र ठिकाणी ‘अँटीबायोटिक्सची विक्री बंद करण्याचेही’ त्यांनी पत्रात म्हटले आहे.
डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शन नोटमध्ये रुग्णांत आढळून आलेल्या लक्षणाचे वर्णन स्पष्टपणे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या रुग्णांसाठी अँटीबायोटीक्स किंवा रोगाणुरोधी औषधांचे प्रिस्क्रीप्शन लिहिण्यात आले आहे. या औषधांचा दुरुपयोग आणि जास्त प्रमाणातील वापर रोखण्यासाठी त्यांच्या वापराचे स्पष्ट कारण किंवा गरज मेन्शन करणं आवश्यक असणार आहे.
जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्लूएचओच्या म्हणण्यानुसार, अँटीबायोटीक्स औषधांच्या अतिरिक्त वापरावर अंकुश ठेवण्याच्या अनुषंगाने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. जास्त अँटीबायोटीक्स औषधांचे सेवन केल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी होते. मानवी शरीरात उद्भवणाऱ्या सर्वात मोठ्या १० आजारांपैकी एक कारण ह्या औषधांचा वापर असल्याचंही डब्लूएचओने म्हटले आहे.