गांधीनगर: मागील काही दिवसांपासून गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्स सापडत आहेत. आता पुन्हा एकदा गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा साठा सापडला आहे. गुजरात एटीएसने(Gujarat ATS) मोरबी जिल्ह्यातून 120 किलो 'हेरॉइन' ड्रग्ज जप्त केले आहे. या ड्रग्जची बाजारातील किंमत अंदाजे 600 कोटी रुपये असल्याची माहिती आहे. हे ड्रग्स पाकिस्तानमधून आल्याची माहिती आहे.
ड्रग्सचे दहशतवादी कनेक्शन ?गुजरातमध्ये सागरी मार्गाने अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या या रॅकेटचा गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने विशेष ऑपरेशन करत पर्दाफाश केला. ड्रग्जसोबतच पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणात 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेशी संबंधित खालिद बख्शशी नावाच्या व्यक्तीचा हात असल्याची माहिती आहे. सध्या पोलिसांनी अनेक ठिकाणी छापेमारी केली असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
या आधीही झाली मोठी कारवाईविशेष म्हणजे याआधीही पाकिस्तानातून गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स पाठवण्यात आले आहेत. 11 नोव्हेंबरला गुजरातमधील द्वारकामधून ड्रग्सची मोठी खेप पकडण्यात आली होती. पोलिसांनी प्रथम ड्रग्जची 19 छोटी पाकिटे जप्त केली. यानंतर आरोपीच्या घरातून 47 मोठी पाकिटे जप्त करण्यात आली. तपासात पोलिसांच्या हाती 50 किलो मेफेड्रोन आणि 16 किलो हेरॉईन पकडण्यात आली. जप्त केलेल्या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 350 कोटी रुपये आहे.
जळगावातून 1500 किलो गांजा जप्तकाही दिवसांपूर्वी श्रीनगरहून मुंबईत ड्रग्ज आणणाऱ्या एका टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला होता. त्यानंतर, आता मुंबई एनसीबी पथकाने 1500 किलो गांजा जप्त केला आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे ही कारवाई करण्यात आली. एनसीबीच्या पथकाला खबऱ्याकडून टीप मिळाल्यानंतर पोलिसांनी ट्रकमधून वाहतूक करणाऱ्यात येत असलेला गांजा पकडला आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून तब्बल 1500 किलोचा गांजा जप्त करण्यात आला आहे. आंध्र प्रदेशच्या विखाशापट्टणम येथून हा गांजा विक्रीसाठी महाराष्ट्रात आणण्यात आला होता.