हैदराबादच्या सायबराबाद परिसरातील इनऑर्बिट मॉलजवळ एका भरधाव वेगात येणाऱ्या ऑडी कारनं ऑटोरिक्षाला मागून येऊन जोरदार धडक दिली. यात रिक्षातून प्रवास करणाऱ्या एका ३७ वर्षीय प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी बेदरकार कार चालकाला अटक केली असून चालक दारुच्या नशेत कार चालवत होता अशी माहिती समोर आली आहे. जुबली हिल्स परिसरातून एक युवक पार्टीहून परतत होता. मद्यपान केलेलं असतानाही तो स्वत: ड्रायव्हिंग करत निघाला होता. याचवेळी त्यानं एका ऑटोरिक्षाला मागून येऊन जोरदार धडक दिली. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं असून घडलेली घटना किती भयंकर होती हे व्हिडिओतून स्पष्ट होत आहे.
पोलिसांनी 'हिट अँड रन'प्रकरणी आरोपी सुजीत, त्याचे वडील रघुनंदन रेड्डी आणि त्याचा मित्र आशिष या तिघांनाही अटक केली आहे. सुजीत मद्यधुंद अवस्थेत कार चालवत होता आणि त्याच्यासोबत त्याचे वडील आणि मित्र आशिष देखील कारमध्ये होते अशी माहिती समोर आली आहे. सुजीतचं कारवर नियंत्रण राहिलं नाही आणि त्यानं एका रिक्षाला जोरदार धडक दिली. त्यानंतर त्यांनी तिथून पळ काढला. पण सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून संपूर्ण घटनेचा पर्दाफाश झाला आहे.
एक ऑडी कार मागून येऊन रिक्षाला जोरदार धडक देत असल्याचं या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे. याच फुटेजच्या आधारावर पोलिसांनी आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आहे. रिक्षाचालक आणि एक प्रवासी त्यावेळी रिक्षात होता. अपघातात रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा मृत्यू झालाय, तर रिक्षाचालक जखमी असून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.