उत्तर प्रदेश म्हणजे वेगवेगळ्या घटनांची खाण आहे. तिथे सतत काही ना काही घडत असते. बरेली जिल्ह्यात आज ट्रिपल तलाकच्या पिडीतेने तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्न केले आणि सनातन धर्म स्विकारला आहे. पती नेहमी नशेत मारहाण, शिवीगाळ करत होता. एका रात्री त्याने तलाक तलाक तलाक म्हटले आणि घरातून बाहेर हाकलले, असा आरोप पिडीत महिलेने केला आहे.
यामुळे या महिलेने तिच्यावर प्रेम करणाऱ्या हिंदू तरुणाला गाठले आणि मंदिरात जाऊन लग्न केले. विवाहितेनुसार हे लग्न केल्यामुळे पहिला पती सतत जिवे मारण्याची धमकी देत आहे. यामुळे तिने पोलिसांनी सुरक्षा पुरवावी अशी मागणी केली आहे. रुबीना नावाच्या महिलेची ही व्यथा आहे. ती पती शोएबसोबत संसाराची स्वप्ने पाहत होती. परंतू, ती स्वप्नेच राहिली. तिला पती रोज दारुच्या नशेत मारहाण करायचा. यामुळे तिचे जगणे नरक बनले होते.
तिचे नऊ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तिला शोएबपासून तीन मुले आहेत. त्याने एक आठवड्यापूर्वीच तिला रागाच्या भरात तलाक दिला. याच काळात तिची ओळख प्रेमपाल या तरुणाशी झाली होती. पाच वर्षांपासून दोघे एकमेकांना ओळखत होते. प्रेमपालला ती नेहमी आपले दु:ख सांगायची. दोघांना एकमेकांवर प्रेम वाटू लागले आणि त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.
रुबीना आणि प्रेमपालने बरेलीच्या मढीनाथ येथील एका मंदिरात जाऊन लग्न केले. यास दोघांच्याही घरच्यांची परवानगी होती. रुबीनाने हिंदू धर्माचा स्वीकार केला. आता तिचे नाव पुष्पा आहे. पहिल्या पतीकडून सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे रुबिना उर्फ पुष्पा हिचे म्हणणे आहे. शोएब आपल्या पतीला कधीही मारून टाकू शकतो, अशी भीती तिला वाटत आहे. आज मी रुबीनासोबत लग्न केले आहे. मी तिच्या नवऱ्याला ओळखत होतो. मी पण त्याच्या घरी जायचो. शोएब रुबीनाला खूप त्रास द्यायचा. रुबिनाने तलाकचे सांगितल्यावर आम्ही लग्नाचा निर्णय घेतला असे प्रेमपालने सांगितले.