पोलीस खात्याच्या प्रतिष्ठेला धक्का लावणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशमधील कासगंज येथून हा व्हिडीओ समोर आला आहे. यात पोलीस लाईनमध्ये तैनात असलेला एक पोलीस अधिकारी मद्यधुंद अवस्थेत बस स्टॉपवर एका महिलेसोबत अश्लिल चाळे करताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने कारवाई करत आरोपी अधिकाऱ्याला निलंबित केलं आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एसपी ऑफिसपासून काही अंतरावर एक पोलीस अधिकारी मद्यधुंद अवस्थेमध्ये एका महिलेसोबत अश्लिल चाळे करताना दिसत आहे. तर रस्त्यावर त्याची टोपी पडलेली दिसत आहे. सार्वजनिक ठिकाणी कायद्याचे धिंडवते काढत तो अश्लिल चाळे करत आहे. दरम्यान, आजूबाजूच्या लोकांनी हटकले असता या पोलीस अधिकाऱ्याने आपण बरेली येथील असल्याचे सांगितले. तसेच परिधान केलेली पोलिसांची वर्दी ही खोटी आहे, असा दावाही त्याने केला.
दरम्यान, या प्रकाराबाबत माहिती देताना एएसपी राजेश भारती यांनी सांगितले की, हा व्हिडीओ आमच्या नजरेत आला आहे.. आरोपी एसआय पोलीस लाईनमध्ये तैनात होता. तसेच त्याच्यासोबत त्याची पत्नीही होती. तर एसपी कासगंज अंकिता शर्मा यांनी सांगितले की, या प्रकरणाचं गांभीर्य विचारात घेऊन आरोपी पोलीस अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्यात आलं आहे. तसेच त्याच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.