Jashpur News:छत्तीसगडच्या जशपूरमध्ये शिक्षण विभागाचे कर्मचारी बेलगाम झाले आहेत. आधी जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात दारुची पार्टी झाली, त्यानंतर विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षकाला अटक करण्यात आली. एवढेच नाही तर शाळकरी मुलांकडून काम करुन घेतल्याचा प्रकारही समोर आला. त्यानंतर आता एका महिला शिक्षिकेने दारू पिऊन शाळेत आल्याचे प्रकरण समोर आले आहे.
जशपूरमधील एका प्राथमिक शाळेत शिक्षणाधिकारी शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचले होते. यावेळी त्यांना शाळेतील दृष्य पाहून मोठा धक्का बसला. बीईओ सिद्दीकी यांनी वर्गात प्रवेश केला तेव्हा त्यांना महिला शिक्षिका जगपती भगत खुर्चीवर झोपलेल्या आढळल्या. यावर त्यांनी आवाज देऊन शिक्षिकेला उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र ती उठली नाही. त्यानंतर मुलांनी सांगितले की, मॅडम दारुच्या नशेत शाळेत पोहोचल्या आणि वर्गातच बेशुद्ध पडल्या. विशेष म्हणजे, शिक्षिका बेशुद्ध पडल्यानंतर मुलांनीच मॅडमला उचलून खुर्चीवर बसवलं.
वैद्यकीय चाचणी घेण्याच्या सूचना ही बाब बीईओला समजताच त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक प्रतिभा पांडे यांना बोलावून शिक्षिकेची वैद्यकीय चाचणी घेण्यास सांगितले. यानंतर दोन महिला कॉन्स्टेबलने त्या शिक्षिकेला पोलिसांच्या वाहनातून रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी तपासणी केली असता शिक्षिक जगपती भगत यांच्या शरीरात दारू असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेनंतर बीईओंनी शिक्षिकेवर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे.