नवी दिल्ली : देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. याआधी लसीकरणाची रंगीत तालीम अर्थात ड्राय रन आज संपूर्ण देशात पार पडत आहे. देशातील जवळपास ७३६ जिल्ह्यांमध्ये ही ड्राय रन असणार आहे.
यापूर्वी २८ आणि २९ डिसेंबरला ४ राज्यांत दोन दिवसांसाठी ड्राय रन घेण्यात आली. यानंतर २ जानेवारी रोजी सर्व राज्यात ड्राय रन घेतलीआणि आता ३३ राज्यांमध्ये (हरयाणा, हिमाचल आणि अरुणाचल वगळता) आणि केंद्रशासित प्रदेशात पुन्हा लसीकरणाची ड्राय रन सुरू केली जात आहे.
दरम्यान, गुजरात, पंजाब, आसाम आणि आंध्र प्रदेशात ड्राय रन केल्यानंतर त्याचे परिणाम चांगले दिसून आले. त्यानंतर केंद्र सरकारने ड्राय रन देशभर राबविण्याचा निर्णय घेतला होता. आता पुन्हा एकदा केंद्र सरकार संपूर्ण देशात ड्राय रन होणार आहे.
गुरुवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसमवेत आढावा बैठक घेतली. सर्व राज्यांचे आरोग्यमंत्री आणि मुख्य अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत डॉ. हर्षवर्धन यांनी लसीविरूद्ध पसरलेल्या चुकीच्या माहितीबद्दल चिंता व्यक्त केली आणि यामुळे लसीकरणाच्या तयारीला धक्का बसू शकेल, असे सांगितले.
येत्या आठवड्यापासून लसीकरणाला सुरुवात?येत्या आठवड्यापासून देशातील लसीकरण कार्यक्रमाला सुरुवात प्रारंभ होऊ शकतो. मंगळवारी आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते की, लसीकरण कार्यक्रम कोरोना लसीच्या मंजुरीनंतर 10 दिवसानंतर सुरू होऊ शकेल. कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासंदर्भात डीसीजीआयने 3 जानेवारीला मान्यता दिली. यानुसार, देशात कोरोना लसीकरण कार्यक्रम 13 किंवा 14 जानेवारीपासून सुरू होऊ शकेल.
ड्राय रनमध्ये काय होणार?कोरोना लसीसाठी घेण्यात येणाऱ्या या ड्राय रनमध्ये कोविड 19 रोलआऊटच्या सर्व पैलू उदाहरणार्थ राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि रुग्णालय स्तरांवरील अधिकाऱ्यांची ओळख पटवून दिली जाईल. कोविड 19चे लसीकरण सुरु करण्यासाठी वॉक-इन-फ्रीजर, वॉक-इन-कूलर, आइस-लाइंड रेफ्रिजरेटर, डीप फ्रीजरसोबतच सिरिंज आणि इतर संसाधनांच्या पुरेशा साठ्याबाबचीही निश्चिती करण्यात येईल.