कडक सॅल्यूट! मातृत्त्व आणि खाकी वर्दीचं कर्तव्य बजावतेय 'ती'; महिला अधिकाऱ्याचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 01:00 PM2021-10-21T13:00:22+5:302021-10-21T13:02:15+5:30
DSP Monika Singh : एकीकडे मातृत्त्व आणि दुसरीकडे खाकी वर्दीचं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
नवी दिल्ली - प्रत्येक आई आपल्या मुलांच्या सुखासाठी वाटेल ते करते. त्याच्या आवडी निवडीचा प्रामुख्याने विचार करते. मुलांसाठी काबाडकष्ट करते. अशाच एका आईची प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. एकीकडे मातृत्त्व आणि दुसरीकडे खाकी वर्दीचं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील त्याचं भरभरून कौतुक केलं आहे. डीएसपी मोनिका सिंह (DSP Monika Singh) असं या महिला अधिकाऱ्याचं नाव असून त्यांच्यावर शिवराज सिंह चौहान यांच्या सुरक्षेची जबाबदारी होती. याचवेळी आपल्या दीड वर्षांच्या लेकीची देखील जबाबदारी असल्याने त्या लेकीला घेऊन आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचल्या.
मोनिका सिंह यांनी कॅरिअर बॅगमध्ये दीड वर्षांच्या मुलीला ठेवून ती आपल्या शरीराला बांधली. मातृत्त्व आणि कर्तव्य एकत्रित रित्या बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्याला पाहून मुख्यमंत्र्यांना देखील राहावलं नाही. त्यांनी डीएसपी मोनिका सिंह यांच्याशी संवाद साधला. त्यांच्यासोबत फोटो काढले आणि आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ते शेअर केले आहेत. शिवराज सिंह चौहान यांनी फोटो ट्विट करुन महिला अधिकाऱ्याची स्तुती केली. "अलीराजपूर भेटीदरम्यान मी डीएसपी मोनिका सिंह आणि त्यांच्या दीड वर्षांच्या मुलीला पाहिलं. कर्तव्याप्रती त्यांचं समर्पण कौतुकास्पद आहे. मध्य प्रदेशला तुमचा अभिमान आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो आणि चिमुकलीला खूप खूप आशीर्वाद देतो" असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
अलीराजपुर यात्रा के दौरान मैंने देखा कि डीएसपी मोनिका सिंह अपनी डेढ़ वर्ष की बेटी को बेबी कैरियर बैग में लिए ड्यूटी पर तैनात थीं।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) October 20, 2021
अपने कर्तव्य के प्रति उनका यह समर्पण अभिनंदनीय है। मध्यप्रदेश को आप पर गर्व है।
मैं उन्हें अपनी शुभकामनाएं और लाडली बिटिया को आशीर्वाद देता हूं। pic.twitter.com/XFk7h2yxyY
मुख्यमंत्र्यांनी मोनिका सिंह यांची आपुलकीने केली चौकशी
मिळालेल्या माहितीनुसार, डीएसपी मोनिका सिंह यांनी दीड वर्षाच्या मुलीला कॅरिअर बॅगमध्ये ठेवलं होतं. जिथे मुख्यमंत्र्यांचं आगमन होणार आहे. त्या हेलिपॅडजवळ त्या उभ्या होत्या. याच दरम्यान जेव्हा मुख्यमंत्री परत जाऊ लागले, तेव्हा त्यांची नजर महिला पोलीस अधिकाऱ्यावर पडली. त्यानंतर त्यांनी मोनिका सिंह यांची आपुलकीने चौकशी केली. चौकशीनंतर मोनिका आणि त्यांच्या दीड वर्षाच्या लेकीसोबत त्यांनी फोटोही काढल्याचं म्हटलं जात आहे.
"आई म्हणून जबाबदारी पार पाडायची होती आणि पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्य निभवायचं होतं"
मोनिका सिंह यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, "मी आपल्या मुलीला घेऊन मुख्यमंत्र्यांच्या सेवेला गेली कारण मला धारपासून 145 किमी दूर अलीराजपूरला जायचे होते. मंगळवारी सकाळी जेव्हा मी आपल्या ड्युटीसाठी यायला निघाले, तेव्हा माझी मुलगीही झोपेतून उठली आणि सोबत येण्याचा हट्ट धरू लागली. मग मला त्यावेळी खूपच भावनिक व्हायला झालं, मला एक आई म्हणून जबाबदारी पार पाडायची होती आणि एक पोलीस अधिकारी म्हणून माझे कर्तव्य निभवायचं होतं." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.