आगरतळा- अत्यंत विचित्र विधानांमुळे चर्चेत येणाऱ्या विप्लव देव यांनी आता एक नवे विधान करुन खळबळ उडवून दिली आहे. पाण्यात बदक पोहल्यामुळे पाण्यात ऑक्सिजन वाढतो असे विधान त्यांनी केले आहे. पाण्यात ऑक्सीजनचे प्रमाण वाढण्यासाठी ते संपूर्ण राज्यात बदकांचे वाटप करण्याचा विचार करत आहेत.देव यांच्या मते, बदक वाटल्यामुळे ग्रामिण अर्थव्यवस्थेत तेजी येईल. बदक पाण्यात पोहल्यामुळे पाण्याचे रिसायकलिंग होते आणि त्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. नीरमहल येथे नौकानयन स्पर्धेचा शुभारंभ करताना त्यांनी आपली 'मते' मांडली. विप्लव देव त्यांच्या सरकारतर्फे मासेमारी करणाऱ्या लोकांना 50 हजार बदकांचे वाटप करणार आहेत. जलाशयांच्या शेजारी पर्यटन केंद्रांजवळ यांचे वाटप होईल आणि त्यामुळे निसर्ग सौंदर्यात भर पडेल व ग्रामिण अर्थव्यवस्थेत भर पडेल असे त्यांना वाटते.
त्रिपुरात ‘एनआरसी’ची आवश्यकता नाही
यापुर्वी विप्लव देव यांनी अनेकदा अशी विधाने केली होती. याआधी त्यांनी एकदा आपल्या कामात नाक खुपसायचा प्रयत्न केल्यास मी त्याची नखंच तोडून टाकेन असं विधान केलं होतं. सकाळी ८ वाजता भाजी विक्रेता बाजारात दुधी घेऊन येतो आणि ९ वाजेपर्यंत त्यांची पार वाट लागते. कारण, येणारा प्रत्येक ग्राहक या दुधीला नखं लावत असतो. मी असं होऊ देणार नाही. माझ्या सरकारला कुणीही हात लावू शकत नाही. त्यात कुणी नाक खुपसलं, हस्तक्षेप करायचा प्रयत्न केला तर मी त्यांची नखंच तोडून टाकेन', असं विधान करून विप्लव देव यांनी पुन्हा नवा वाद ओढवून घेतला होता.