बरेली : अर्धांगवायूमुळे अंथरुणाला खिळलेल्या उत्तर प्रदेशातील बरेलीच्या एका ५० वर्षीय महिलेचा उपासमारीने मृत्यू झाल्याचा आरोप महिलेच्या पतीने केला आहे. शकिना अशफाक असे या मृत महिलेचे नाव असून, आजारी असल्यामुळे ती रेशन आणण्यासाठी दुकानात जाऊ शकत नव्हती.कुटुंबाची प्रमुख म्हणून या महिलेचे नाव कार्डवर होते. मात्र, आजारी असल्यामुळे आधारच्या फिंगरप्रिंट प्रमाणीकरणासाठी ती दुकानात जाऊ शकत नव्हती.उत्तर प्रदेश सरकारने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. प्राथमिक तपासातून असे दिसून आले आहे की, शकिना यांचा आजाराने मृत्यू झाला.उपासमारीमुळे नव्हे, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. स्थानिक प्रशासनाने उपासमारीचे आरोप फेटाळून लावताना सांगितले की, शकिना यांच्या बँक खात्यात ४००० रुपये होते. पुरवठा अधिकारी सीमा त्रिपाठी यांनी सांगितले की, जर लाभार्थी बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी स्वत: येऊ शकला नाही तर धान्य नाकारावे, असे कोणतेही आदेश या कार्यालयाकडून नाहीत. (वृत्तसंस्था)या महिलेचे पती मोहम्मद इशाक यांनी सांगितले की, आपल्या पत्नीने पाच दिवसांपासून अन्न घेतले नाही. सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे धान्य देण्यास यंत्रणेने नकार दिला. पत्नीचा मृत्यू उपासमारीमुळेच झाला. ती खूपच आजारी होती. आम्ही तिला रिक्षातून घेऊन गेलो; पण बायोमेट्रिकशिवाय धान्य देणार नाही, असे दुकानदाराने सांगितले.
आधारकार्ड नसल्याने उपासमारीमुळे महिलेचा मृत्यू ? बायोमेट्रिकशिवाय धान्य देण्यास दुकानदाराचा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:16 AM