नाशिक : २२ मे आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन म्हणून साजरा केला जातो. निसर्गातील विविध पक्षी, औषधी वनस्पती, वृक्ष प्रजाती, किटक, माती, पिके आदिबाबत जनसामान्यांमध्ये जागृती व्हावी, जेणेकरून नैसर्गिक जैवविविधतेचे संवर्धन होण्यास मदत होईल; मात्र जिल्हास्तरावरील समितीच्या गावी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन नसल्याचे प्रकर्षाने जाणवले. शहर व परिसरात या समितीकडून कुठलेही जनजागृतीपर उपक्रम राबविण्याचा प्रयत्न झाला नाही, त्यामुळे समितीच्या अस्तित्वाविषयी शंका निर्माण झाली आहे.जैवविविधतेचे संवर्धन व संरक्षण व्हावे, यासाठी केंद्र सरकारकडून २००२ साली जैविकविविधता कायदा करण्यात आला. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने जैविकविविधता नियम, २००८ तयार केले. याअंतर्गत शहरात जिल्हास्तरीय जैविकविविधता व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली; मात्र या समितीवर असलेल्या विविध शासकीय अधिकारी सदस्यांकडून व्यापक प्रमाणात जैवविविधतेच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जात नसल्याने सदर समिती केवळ कागदावरच असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. वर्षभर या समितीमार्फत जिल्हास्तरावरील विविध गाव, आदिवासी पाडे या भागांमध्ये आढळणारे प्राणी, पक्षी, फुले, औषधी वनस्पती, प्रमुख पिके, सरपटणारे प्राणी आदिंची वर्गवारी करून त्याची माहिती संकलित करणे अपेक्षित आहे; मात्र या अनुषंगाने कुठलेही कार्य जिल्हास्तरीय समितीकडून पार पाडले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या औचित्यावरदेखील शहरात कोठेही जैवविविधतेविषयी जनसामान्यांमध्ये जागृती निर्माण करणारे किंवा जैवविविधतेच्या जोपसनेसाठी पूरक ठरणारे उपक्रम राबविण्यासाठी प्राधान्य देण्याचा प्रयत्न समितीकडून करण्यात आला नाही.इन्फो.......वनविभागाकडून वृक्षारोपणआंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या औचित्यावर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व वन विभाग नाशिक पश्चिमच्या कर्मचार्यांकडून पाथर्डी वन कक्ष क्रमांक २२६ च्या जागेत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रभारी उपवनसंरक्षक ए. जी. चव्हाणके, सहायक वनसंरक्षक प्रदीप भामरे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत खैरनार आदि उपस्थित होते. यावेळी जैवविविधता मंडळाचे विभगीय समन्वयक बी. डी. वाघ यांनी जैवविविधता संवर्धनावर मार्गदर्शन केले. हा कार्यक्रमाचा अपवाद वगळता अन्य कोणतेही कार्यक्रम शहर व परिसरात झाले नाही.इन्फो.....मनपाकडून प्रस्ताव मंजूरमहापालिक ा प्रशासनाकडून काही दिवसांपूर्वीच शहर पातळीवर जैवविविधता व्यवस्थापन समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. हा प्रस्ताव पालिकेने मंजूर केला असून महापौर अशोक मुर्तडक हे समिती गठीत करणार आहे. आंतरराष्ट्रीय दिनाच्या औचित्यावर समितीचे गठन होणे गरजेचे होते.
जैवविविधता दिनाचा पडला विसर जनजागृतीकडे काणाडोळा : जिल्हास्तरीय समितीच्या अस्तित्वावर शंका
By admin | Published: May 22, 2016 7:40 PM