ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - लाचखोरी प्रकरणात अटक झालेले माजी सनदी अधिकारी बी के बन्सल आणि त्यांच्या मुलानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सोमवारी रात्री 8.40 वाजण्याच्या सुमारास घरातील नोकराला बी के बन्सल आणि त्यांचा मुलगा मृतावस्थेत आढळला. पोलिसांना घरामध्ये चार सुसाईड नोट हाती सापडल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वी बन्सल यांच्या पत्नी आणि मुलीनेदेखील आत्महत्या केली होती. त्यामुळे लाचखोरी प्रकरणामुळे संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झालं आहे.
सुसाईड नोटवर प्रत्येकाने आपला फोटो लावला असून नातेवाईकांचे फोन क्रमांक देखील लिहिले आहेत. सुसाईड नोटमध्ये लाचखोरी प्रकरणात कारवाई करणा-या सीबीआयला जबाबदार धरण्यात आले आहे. बी के बन्सल हे कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्रिमध्ये कार्यरत होते.
17 जुलैला मुंबईस्थित एका कंपनीकडून 9 लाख रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आली होती. यानंतर सीबीआयला चौकशीदरम्यान त्यांच्या सरकारी निवासस्थानी 60 लाख रुपये, प्रॉपर्टी पेपर्स आणि बँकेच्या खात्यांची माहितीपत्र मिळाली.
बन्सल यांना अटक झाल्यानंतर त्यांची पत्नी सत्यबाला आणि मुलगी नेहा यांनीदेखील गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांनी देखील सुसाईड नोटमध्ये सीबीआयलाच जबाबदार धरले होते. पत्नी आणि मुलीच्या अंत्यसंस्कार विधीसाठी 26 ऑगस्टला बन्सल यांची जामीनावर सुटका करण्यात आली होती. यादरम्यान बन्सल आणि त्यांच्या मुलानं आत्महत्या करुन स्वतःचे आयुष्य संपवलं आहे.