नवी दिल्ली – २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची आठवणी आजही लोकांसमोर ताज्या आहेत. या लढाईत राष्ट्रीय सुरक्षा दल(NSG)चं नेतृत्व करणारे माजी प्रमुख जे.के दत्त यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ते ७२ वर्षांचे होते. ऑक्सिजन पातळी खालावल्याने त्यांचे निधन झाल्याचं कुटुंबीयांकडून सांगण्यात आलं. गेल्या १४ एप्रिलपासून ते गुडगांवच्या मेदान्ता हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते.
दत्त यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. मुलगा नोएडा येथे राहतो. तर मुलगी अमेरिकेत स्थायिक आहे. सीआरपीएफचे एडीजी जुल्फिकार हसन म्हणाले की, जे के दत्त असे अधिकारी होते ज्यांनी कॅडर आणि केद्रीय प्रतिनियुक्तीवर उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. नेहमीच त्यांनी पुढं येऊन नेतृत्व केले होते. NSG नं ट्विट केलंय की, श्री ज्योतिकृष्ण दत्त यांचे गुरुग्रामच्या हॉस्पिटलमध्ये १९ मे रोजी निधन झालं. जे के दत्त यांनी देशासाठी दिलेलं योगदान नेहमीच आठवणीत ठेवलं जाईल. त्यांच्या नेतृत्वात ब्लॅक कमांडोंनी २६/११ च्या मुंबई हल्ल्यावेळी नेतृत्व केले होते हे कधीच विसरता येणार नाही असं म्हणत त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
कोण होते जे. के दत्त?
जे. के दत्त हे पश्चिम बंगाल कॅडरमधील १९७१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. त्यांनी सीबीआय आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदावर कार्य केले आहे. ८ ऑगस्ट रोजी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटमध्ये नियुक्ती समितीने त्यांच्या नावाला मंजूरी दिली होती. दिल्लीच्या विश्वविद्यापीठातून जे. के दत्त यांनी इतिहासातून पोस्ट ग्रॅज्यूएशेन केले आहे.
देशभरात साडेचार हजार कोरोनाबाधितांचा मृत्यू!
देशात कोरोना बाधितांची संख्या कमी होत आहे; परंतु मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांमध्ये ४ हजार ५२९ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. गेल्या २४ तासांमध्ये भारताचा कोरोना मृत्यूदर १.११% नोंदवण्यात आला आहे. दोन दिवसातच जवळपास ८ हजार ८५८ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दररोज ५ हजारांवर रुग्णांचा मृत्यू होईल असे तज्ज्ञांकडून भाकीत वर्तवण्यात आले होते. ते खरे ठरण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात ६७९ रुग्णांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटक ५२५, तामिळनाडू ३६४, दिल्लीत २३५, उत्तर प्रदेशात २५५ रुग्णांचा मृत्यू झाला