ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - पहिले ' अतुल्य भारत' मग रस्ते सुरक्षा मोहिम, त्यानंतर टाटा स्काय आणि आता ' स्नॅपडील'.. एकेकाळी सर्व ब्रँड्सना हवाहवासा असलेला अभिनेता आमिर खान आता कोणालाही नको आहे. देशातील असहिष्णूतेच्या मुदयावरून आमिरने केलेले वक्तव्य त्याला अतिशय महागात पडले असून इतर ब्रँड्ससह आता त्याला 'स्नॅपडील'चे ब्रँड अॅम्बेसेडरपदही गमवावे लागले असून कंपनीने त्याचे कॉन्ट्रॅक्ट वाढवून न देण्याचा निर्णय घेतला आहे.
इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आमिरचा या ई-कॉमर्स कंपनीशी असलेला एक वर्षाचा करार या महिन्याखेरीस सपुंष्टात येणार असला तरी त्याला आणखी एक वर्षाची मुदतवाढ मिळणार होती. मात्र आता कंपनीने तसे करण्यास नकार दर्शवत हा करार संपवण्याचा निर्णय घेतला' असे एका अधिका-याने सांगितल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. मात्र असे असले तरी कंपनी आता खर्चात कपात करण्याच्या दृष्टीने आमिरऐवजी दुस-या कोणत्याही सेलिब्रिटीलाही ब्रँड अॅम्बेसेडर नेमणार नाही. तर सध्या असलेल्या ग्राहकांनाच टिकवणे, नवनवीन कॅटॅगरीज लाँच करणे आणि वेगेवगळ्या योजनांद्वारे ग्राहकांना खरेदीस उद्युक्त करणे, यावर त्यांचा भर असेल.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात असहिष्णूतेच्या मुद्यावरून आमिरने केलेल्या वक्तव्यामुळेच कंपनीने हा निर्णय घेतल्याचे समजते. त्या प्रकरणावरून झालेल्या वादानंतर स्नॅपडीलने आमिरच्या जाहिराती दाखवणेही बंद केले होते.
नोव्हेंबर महिन्यात दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान बोलताना आमिरने असहिष्णूतेच्या मुद्यावर वक्तव्य केले होते. तसेच या घटनांच्या विरोधात सुरू असलेल्या पुरस्कार वापसीचेही त्याने समर्थन केले होते. पत्नी किरण राव हिने आपण देश सोडून जावे का? अशी विचारणा केल्याचे सांगत आमीरने देशात असहिष्णुता वाढल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. देशातील असुरक्षित वातावरणात मुलांच्या सुरक्षेबाबत भीती वाटत असल्याची भावनाही त्याने व्यक्त केल्यानंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अनेकांनी त्याच्यावर टीका करत त्याला देश सोडून जायचा सल्लाही दिला होता.