ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि, 08 - खराब रस्ते, त्यामुळे ठिकठिकाणी होणारी वाहतूक कोंडी आणि इंधनाचा अतिरिक्त वापर याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होत आहे. भारताला यामुळे वर्षाला 1.4 लाख कोटींचं नुकसान होत आहे. ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑप इंडिया आणि आयआयएम-कोलकाताने संयुक्तरित्या केलेल्या अभ्यासात ही माहिती समोर आली आहे.
भारताला होत असलेल्या आर्थिक नुकसानात इंधनाचा अतिरिक्त वापर सर्वात महत्वाचं कारण असल्याचं या अभ्यासात नमूद करण्यात आलं आहे.
इंधन खर्च 97 हजार कोटींपर्यंत
अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार खराब रस्त्यांमुळे होणारा उशीर यामुळे वर्षाला अंदाजे 6.6 अरब डॉलरचं नुकसान होतं. तर इंधनाच्या अतिरिक्त वापराचा खर्च वर्षाला 14.7 अरब डॉलर होत आहे. भारतामध्ये वाहतुकीसाठी साधने मर्यादित आहेत. त्यामुळे सामानाची डिलिव्हरी करण्यासाठी रस्त्याचा किंवा रेल्वेचा अधिक वापर केला जातो. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे देशातील महत्वाच्या 28 मार्गावर करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे हा अहवाल प्रसिद्ध केल्याचं गडकरींनी सांगितलं आहे.
वाहूतक करण्यासाठी हवाई आणि पाणीमार्गाचा वापर अत्यंत कमी प्रमाणात करण्यात येतो. रस्ते वाहतूक खात्रीची तसंच कार्यक्षम असल्याने अनेकजण रस्त्याने प्रवास करणे पसंत करतात. रस्त्याने प्रवास केल्याने ठरल्या वेळेत पोहोचता येतं. मात्र रेल्वेमध्ये बिघडलेलं वेळापत्र, अपुरी सेवा, सामान ठेवण्यासाठी डब्यांमध्ये नसलेली जागा यामुळे रेल्वेने प्रवास करणं टाळलं जात असं अभ्यासात दिसून आलं आहे.
गेल्या तीन वर्षात 2011-12शी तुलना करता दिल्ली - बंगळुरु आणि दिल्ली - मुंबई मार्गावत वाहतूक दरापेक्षा वाहतूक खर्चच जास्त वाढल्याचं निदर्शनात आलं आहे.