नवी दिल्ली : कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्चने गठित केलेल्या प्रवासी भारतीय अकॅडमिक अँड सायंटिफिक संपर्क (प्रभास) या आंतरमंत्रालयीन उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष म्हणून माजी परराष्ट्र सचिव तसेच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यासंदर्भातील पहिली बैठक उद्या होत असून विदेशात असलेल्या भारतीयांच्या ज्ञानाचा इथे उत्तम उपयोग करण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे डॉ. मुळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. डॉ. मुळे म्हणाले, विविध देशांत ३ कोटी भारतीय आहेत. त्यातील बहुतांश विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात अव्वल आहेत. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग इथल्या भारतीयांना करून देण्याचा प्रयत्न आहे.आत्मनिर्भर भारतासाठीविदेशातील भारतीयांचा आत्मनिर्भर भारतासाठी जास्तीत जास्त उपयोग कसा करता येईल याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊ. देशाच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारच्या समितीची स्थापना करण्यात आली आहे. उच्चाधिकार समितीत विविध मंत्रालयांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. माझ्या परराष्ट्र सेवेतील अनुभवांचा देशासाठी उपयोग करण्याचे प्रयत्न राहतील, असे ज्ञानेश्वर मुळे यांनी सांगितले.