ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 15 - धोतर घातलं असल्याने एका व्यक्तीला कोलकातामधील क्वेस्ट मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धोतर म्हणजे आपल्या पारंपारिक पोषाखाचा भाग असताना अशाप्रकारे मॉलमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये अशा प्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. दिल्लीमधील एका क्लबमध्ये एका महिलेलाही कपड्यांवर आक्षेप घेत प्रवेश नाकारण्यात आला होता.
यावेळी त्या व्यक्तीसोबत त्याची मैत्रीण डेबलीना सेनदेखील उपस्थित होती. माझ्या मित्राने व्यवस्थित कपडे घातले होते. त्यावर आक्षेप घेण्यासारखं काहीच नव्हतं असं त्यांनी सांगितलं आहे. डेबलिना एक अभिनेत्री आहे.
डेबलीना यांनी फेसबूवरुन सविस्तरपणे या घटनेची माहिती दिली आहे. "अजून एक घटना. गेल्या काही दिवसांपासून अशा घटनांची मालिका सुरु असताना आता मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला आहे. कोलकातामधील क्वेस्ट मॉलमध्ये धोतर आणि कुर्ता घातलेल्या व्यक्तीला प्रवेश नाकारण्यात आला. विशेष म्हणजे धोतर किंवा लुंगी घातली असल्यास हा मॉल प्रवेश करु देत नाही", असं डेबलीना यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये लिहिलं आहे.
"अशा प्रकारचा भेदभाव आपल्या समाजात वाढत चालला असून हे अत्यंत घृणास्पद असल्याचंही", त्या बोलल्या आहेत.
"ही व्यक्ती मॉलमध्ये प्रवेश करत असताना सुरक्षा रक्षकाने त्यांना थांबवलं, आणि वॉकी-टॉकीवरुन कोणाशी तरी संपर्क साधला. ज्याला थांबवण्यात आलं त्याला इंग्लिश बोलता येत होतं म्हणून नंतर मग प्रवेश देण्यात आला. आतमध्ये गेल्यावर आम्ही मॅनेजमेंटशी जेव्हा चर्चा केली तेव्हा तेथील व्यक्तीने आम्ही लुंगी किंवा धोतर घातलेल्या व्यक्तीला प्रवेश देत नाही असं स्पष्ट सांगितलं असल्याचंही", डेबलीना बोलल्या आहेत.