निवाणे : कळवण तालुक्यातील पशू व्यवसायावर व दुग्ध व्यवसायावर यंदाच्या दुष्काळाची वक्रदृष्टी पडलेली दिसून येत आहे. अल्पप्रमाणात झालेल्या पावसामुळे परिसरातील नदी, नाले, कोल्हापूर टाईप बंधारे कोरडे पडण्यास सुरुवात झाली आहे. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यातच पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. अपुर्या पाण्यामुळे पिकावर अनिष्ठ परिणाम झाला आहे. चाराटंचाई निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीचा परिणाम पशुपालन व त्यावर अवलंबून असलेल्या दुग्धव्यवसायावरही झालेला दिसून येत आहे.दुग्ध व्यवसायही मंदित आला आहे. परिणामी बाजारात दुधाचे भाव वाढले आहेत. पाऊस कमी झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले असून, त्यापासून मिळणार्या चार्याचा तुटवडा भासत आहे. परिसरातील काही भागात जनावरांना पिण्यासाठी पाणीदेखील उपलब्ध नाही अशी भयावह स्थिती निर्माण झाली आहे. निवाणे, दहाणे, मटाणे, भेंडी, सिरसमणी, ओतूर, कुंडाणे, भुसणी, आंडबे, गोवापूर, नांदुरी, कळमळे, एकलहरे, पाळे, वरवंडी, शिंदेवाडी, नरूळ, महेदर, जिराडे आदि गावांसह परिसरातील पशुपालन व्यवसायावर परिणाम झाला आहे.परराज्यातून आलेले पशुपालक काठेवाडीदेखील यंदाची दुष्काळी परिस्थिती बघून थक्क झाले आहेत. कमी पडलेल्या पावसामुळे पडीत जमिनी व वनविभागाच्या हद्दीतदेखील चारा राहिलेला नाही. नदी, नाले, बंधारे काही अंशी कोरडे झाले आहेत, तर काही होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी काठेवाडी समाजाला पशुधन जगविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. परिणामी दुग्ध व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे.या वर्षाच्या दुष्काळामुळे पशुपालक मेंढपाळही चार्यासाठी वणवण भटकत आहेत. चारा व पाणी मिळेल त्या ठिकाणी कुटुंबासह राहून दिवस काढण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. अशा विविध समस्यांमुळे कळवण तालुक्यातील दुग्ध व्यवसाय अडचणीत येत असल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)
दुष्काळामुळे कळवण तालुक्यातील दुग्ध व्यवसाय अडचणीत
By admin | Published: December 20, 2015 11:59 PM