ऑनलाइन लोकमत -
हरिद्वार, दि. ११ - 'शिर्डीच्या साईबाबांची पूजा केल्यामुळेच महाराष्ट्रात दुष्काळसदृष्य परिस्थिती आली असल्याचं', द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी म्हंटलं आहे. हरिद्वारमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. साईबाबांची पूजा करण्यावरुन शंकराचार्य स्वामी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. याअगोदरही शंकराचार्य स्वामी यांनी साईबाबा देव नाहीत त्यांची पुजा करु नये असं बोलले होते.
'साईबाबा जे एक फकीर होते त्यांनी देव म्हणून पूजलं जात हे अशुभ आहे. ज्या ठिकाणी त्यांची पूजा केली जाते त्याठिकाणी निसर्गाचा प्रकोप होतो. त्या ठिकाणी दुष्काळ, पूर यासारखी संकट येऊन मृत्यूच भय निर्माण होतं', असं विधान शंकराचार्य स्वामी यांनी केलं आहे.
याअगोदरही शंकराचार्य स्वामी यांनी 2014मध्ये साईबाबांची पूजा करण्याला विरोध केला होता. साईबाबा देव नसून त्यांची पूजा करु नये असं फर्मानच त्यांनी काढलं होतं. तसंच आपल्या भक्तांना साईबाबांचे फोटो आणि मुर्ती मंदिरातून हटवण्यासही सांगितलं होतं.
शनिशिंगणापूरमध्ये महिलांना चौथ-यावर प्रवेश देण्याला त्यांनी विरोध केला आहे. त्यांनी चौथ-यावर प्रवेश करायला नको होता असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. यामुळे महिलांना वाईट गोष्टींचा सामना करावा लागेल. शनी हा पाप ग्रह आहे. त्याची पूजा केल्यामुळे महिलांविरोधातील गुन्हे वाढतील असा अजब तर्क त्यांनी लावला आहे.