मुंबई - नोटाबंदी लागू करण्यापूर्वी जेवढ्या नोटा अर्थव्यवस्थेत होत्या, जवळपास तेवढ्याच नोटा आता पुन्हा चलनात आल्या आहेत. जवळ आलेल्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी रोख रकमा साठवून ठेवल्यामुळे ही स्थिती उद्भवली असावी, असे प्रतिपादन स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) केले आहे.निवडणुका जवळ आल्या की, लोकांकडील पैशांत वाढ होते, हे रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर रघुराम राजन यांनी एप्रिल २0१६ मध्ये अधिकृतरीत्या मान्य केले होेते. निवडणुकांच्या तोंडावर लोकांकडील पैशांत साधरणत: वाढ दिसून येते. असे का होते, याचा अंदाज तुम्ही बांधा. आम्हीही अंदाज लावत आहोत, असे राजन यांनी म्हटले होते. ज्या राज्यांत निवडणुका असतात, त्या राज्यांतील रोख रकमेची मागणी वाढतेच, पण त्यांच्या आजूबाजूच्या राज्यांतही ही मागणी वाढते, असे राजन यांनी नमूद केले होते.एसबीआयचे मुख्य अर्थतज्ज्ञ सौम्यकांती घोष यांनी सांगितले की, दोन महिन्यांत चलनातील रोख रक्कम वेगाने वाढत आहे. जानेवारी व फेब्रुवारीत ही वाढ अनुक्रमे 0.४५ लाख कोटी आणि 0.५१ लाख कोटी रुपये होती. गेल्या वर्षी याच काळातील ही वाढ अनुक्रमे 0.१ लाख कोटी आणि 0.२ लाख कोटी रुपये होते.घोष म्हणाले की, २0१८ मध्ये अनेक राज्यांत निवडणुका होणार आहेत. त्यामुळे चलनातील नोटांचे प्रमाण असेच वाढत राहील. चलनातील रोख रक्कम वाढल्यामुळे बँकांच्या ठेवीत घट होईल. कारण हा पैसा बँकांमधूनच चलनात जात असतो. ठेवींच्या कमतरतेमुळे बँकांनी सरकारी रोख्यांच्या खरेदीकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे सरकारने रोख्यांची किंमत कमी करून परताव्यात वाढ केली आहे. भारतातील रोखे परतावा अमेरिकेच्या तुलनेत तिप्पट जास्त झाला आहे, असे घोष यांनी सांगितले.बँक ठेवी झाल्या कमीनोटाबंदीनंतर काही काळ बँकांतील ठेवींचे प्रमाण वाढले खरे, त्यानंतर मात्र ते घसरणीला लागले होते. नोव्हेंबर २0१७ मध्ये ठेवींमधील वृद्धी सर्वाधिक १५.६ टक्क्यांवर होती. १६ फेब्रुवारी २0१८ ला संपलेल्या पंधरवड्यात ठेवींचा वृद्धीदर घसरून ५.९ टक्क्यांवर आला होता.
निवडणुका जवळ आल्यामुळे लोकांच्या हाती पैसा वाढला? एसबीआयचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 2:13 AM