ऑनलाइन लोकमत
मदुराई, दि. १७ - विवाहबाह्य संबंधांमुळे घटस्फोट झालेल्या महिलेला तिच्या पतीकडून पोटगी मिळू शकत नाही असा महत्त्वपूर्ण निकाल मद्रास हायकोर्टाने दिला आहे. अशा प्रकरणात महिलेने पतीऐवजी ज्या व्यक्तीसोबत संबंध होते त्याच्याकडून पोटगी मागितली पाहिजे असेही हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.
मदुराईमधील रामनाथपुरम येथे राहणा-या एका सरकारी कर्मचा-याचे २०११ मध्ये पत्नीसोबत घटस्फोट झाला होता. पत्नीचे विवाहबाह्य संबंध घटस्फोटासाठी कारणीभूत ठरले होते. घटस्फोटाच्या वेळी रामनाथपुरम येथील सत्र न्यायालयाने पतीने पत्नीला दरमहा एक हजार रुपयांची देणगी देण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाविरोधात पतीने मद्रास हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टाचे न्या. एस नागमुथ्थू यांनी नुकताच या खटल्याचा निकाल दिला. विवाहबाह्य संबंधांमुळे घटस्फोट झालेल्या महिलेला तिच्या पतीकडून पोटगी मागण्याचा अधिकार नाही असे मत मांडत कोर्टाने पतीच्या बाजूने निकाल दिला.