नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी सकाळी सहा उड्डाणे रद्द करावी लागली तर ६० विमानांना विलंब झाला. जवळपास ४० देशांतर्गत व २६ आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांना विलंब सोसावा लागला. गेल्या दोन दिवसांत या विमानतळावर शून्य असलेली दृश्यमानता २०० मीटर्सपर्यंत सुधारली. हिमाचल प्रदेश व काश्मीरमध्ये थंडीची लाट असून, सिमल्यातील तापमान मंगळवारी शून्य अंशाच्या खाली गेले होते. श्रीनगरमध्ये तापमान ३ अंश होते. मात्र लडाख, लेह, कुपवाडा, गुलमर्ग येथे कडाक्याची थंडी जाणवत होती.रस्त्यांवर प्रचंड धुके असल्याने वाहने पुढे सरकण्यात अडथळे निर्माण होत होते. परिणामी दिल्ली, उत्तर प्रदेश तसेच हरयाणा व पंजाबमध्ये वाहतूक मंद गतीने सुरू होतीआणि अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाली होती. धुक्यामुळे मंगळवारी ६४ रेल्वेंना विलंब झाला तर २१ रेल्वे रद्द झाल्या. २४ रेल्वेचे वेळापत्रक बदलावे लागले.पंजाब, हरयाणाही गारठलेअतिशय दाट धुक्याचे आवरण पंजाब व हरियाणाच्या अनेक भागांवर आले असून त्यामुळे हवाई, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. शिवाय या दोन्ही राज्यांत थंडीची तीव्र लाट आली आहे. तेथील किमान तापमान अनेक भागांमध्ये सामान्य तापमानापेक्षा तीन अंश वर तर एक अंश खाली गेले आहे. भटिंडामध्ये २.७ अंश सेल्सिअस तापमान होते. पंजाब व हरियाणातील दृश्यमानता ही २०० मीटर्सवर होती.इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारीही अत्यंत कमी दृश्यमानतेमुळे500पेक्षा जास्त उड्डाणांना विलंब झाला होता. विमानतळावरील कामकाज धुक्यामुळे जवळपास चार तास बंद पडले होते. दुपारनंतर ते पुन्हा सुरू झाले होते. राजस्थानच्या डीग (जिल्हा भरतपूर) गावानजीक मंगळवारी मध्यरात्री दाट धुक्यामुळे जीप तलावात पडून चार जणांचा बुडून मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले.
दाट धुक्यामुळे उत्तर भारतात खोळंबा; रेल्वे, विमान सेवेला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 1:40 AM