पाटणा - बिहारमध्ये दोन शेतकऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एक मोठा रेल्वे अपघात टळला आहे. हावडा-बीकानेर एक्स्प्रेस गयेच्या दिशेने जात होती. त्याचवेळी रेल्वे रूळ तुटलेले असल्याचे रुळाशेजारून जात असलेल्या शेतकऱ्यांनी पाहिले. त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडील लाल टॉवेल ट्रेन चालकाच्या दिशेने दाखवून इशारा केला. त्यामुळे सावध झालेल्या चालकाने गाडीचा वेग कमी करून गाडी थांबवली. तेव्हा ग्रामस्थांनी ड्रायव्हरला तुटलेला रेल्वे रूळ दाखवला. तेव्हा ड्रायव्हरने याची खबर स्टेशन मास्तरांना दिली. त्यानंतर ४५ मीनिटांनी हावडा-बीकानेर एक्स्प्रेस दुसऱ्या लाइनवरून रवाना झाली. (Due to the foresight of the farmers, a major train accident was averted)
ही घटना कैमूर येथे घडली. पंडित दीनदयाल आणि गया रेल्वेमार्गादरम्यान, पुसौली रेल्वे स्टेशनपासून एक किलोमीटर पश्चिमेला कुदरा पोलीस ठाणे क्षेत्रातील घटाव गावातील दोन शेतकरी रेल्वे रुळांच्या दिशेने आपल्या शेतात जात होते. तेव्हा त्यांनी रेल्वेरूळ तुटलेला असल्याचे पाहिले. याची माहिती ते पुसौलीच्या स्टेशन मास्टरांना देणार होते तोच अपलाईनवरील सिग्नल ग्रीन झाला. त्यानंतर काही वेळातच अपलाइनवरून २४९६ हावडा-बीकानेर एक्स्प्रेस येताना दिसली. त्यानंतर प्रेमचंद राम आणि राम प्रवेश या शेतकऱ्यांनी लाल टॉवेल दाखवून रेल्वे ड्रायव्हरला इशारा केला. त्यानंतर चालकाने ट्रेन थांबवली. त्यामुळे मोठा अपघात टळला.
दरम्यान, आणीबाणीच्या प्रसंगी शेतकऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे कौतुक करत त्यांना सन्मानित केले. तसेच या शेतकऱ्यांमुळे मोठा अपघात टळल्याचे सांगितले. हावडा-बीकानेर ही ट्रेन अपघातातून वाचल्यानंतर दुसऱ्या लाईनवरून ४५ मिनिटांनी रवाना करण्यात आली. तसेच येथील रुळांच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. दरम्यान, येथील रूळ दुरुस्त करण्यात आले असून, आता रेल्वे वाहतूक सामान्यपणे सुरू होऊ शकते, असे रेल्वे कर्मचाऱ्यांनी सांगितले.