- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या भावात रोज होत असलेल्या वाढीमुळे चिंतित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान आणि नीती आयोग आणि तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी प्रदीर्घ चर्चा केली. या चर्चेचा परिणाम काय होईल हे लगेच स्पष्ट नसले तरी मिळालेल्या संकेतांनुसार पेट्रोलचे भाव कमी होतील, असा कोणताही उपाय सरकारकडे दिसत नाही.
तिकडे काँग्रेस पेट्रोल-डिझेलच्या भावाचा मुद्दा निवडणुकीसाठी वापरण्याच्या प्रयत्नांत आहे. काँग्रेसच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पेट्रोल-डिझेलच्या भावात अशीच वाढ होत असेल तर काँग्रेस राफेल लढावू विमानांच्या खरेदीत झालेल्या घोटाळ्यासोबत पेट्रोल आणि डिझेलच्या भावाचा मुद्दा आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वापरेल.
काँग्रेसच्या या योजनेचे संकेत त्याने गेल्या १५ दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या भावावरून सरकारवर सतत करीत असलेल्या हल्ल्यांतून मिळाले. सोमवारीही काँग्रेसने सरकारवर हल्ला केला.
दस्तावेज जाहीर करून पक्षाचे प्रवक्ते आर.पी. सिंह यांनी आकडेवारीच सांगितली.हाती काय लागले?सिंह म्हणाले की, १२ आॅक्टोबर २०१८ रोजी मोदी यांनी बैठक घेऊन परिस्थितीचे विश्लेषण केले. परंतु हाती काय लागले? काँग्रेसने स्पष्ट म्हटले की, सरकारने पेट्रोल-डिझेलला जीएसटीत आणावे अन्यथा काँग्रेस याच मुद्यावर देशभर सरकारची कोंडी करील.