बस्तर- मुलाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे नसल्याने आईवर मुलाचा मृतदेह मेडिकल कॉलेजमध्ये दान करण्याची वेळ आली. छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यात ही ह्रदयद्रावक घटना घडली आहे. शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिलेचा मुलगा रस्ते अपघातात गंभीर जखमी झाला होता. गंभीर जखमी झालेल्या या मुलाला जगदलपूरमधील मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला.
मुलाच्या मृत्यूनंतर हॉस्पिटलने मुलाचा मृतदेह आईकडे सुपूर्द केला व तरूण मुलावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आईकडे पैसे नव्हते. मुलाचा मृतदेह हॉस्पिटलमधील गावात नेण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नव्हते. हाती पैसे नसल्याने मुलाचा मृतदेह हॉस्पिटलमध्ये ठेवण्याचा विचार त्यांनी केला.
पैसे नसल्याने गावी जाणं शक्य नाही तसंच अंत्यसंस्कारही करता येणार नसल्याचं पाहून बस्तरमधील मेडिकल कॉलेजच्या एका डॉक्टरने मुलाच्या आईला मुलाचा मृतदेह दान करण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी मृतदेह दान केला. बस्तरमध्ये पहिल्यांदा मेडिकल कॉलेजमध्ये देहदान झालं आहे.