रांची : आधारच्या सक्तीमुळे झारखंडमध्ये एका लहान मुलीचा मृत्यू झाला आहे. सिमडेगा जिल्ह्यातील एका रेशन दुकानाने रेशन कार्ड आधारला लिंक न केल्यामुळे कुटुंबाला धान्य नाकारले. त्यामुळे त्या मुलीसकट तिच्या घरातील सर्वांना काही दिवस उपाशी राहावे लागले आणि ती मुलगी ठरली भूकबळी.हा २८ सप्टेंबर रोजी घडलेला प्रकार स्वयंसेवी संस्थेमुळे उघडकीस आल्यावर, स्थानिक प्रशासनाने सुरुवातीला असे काही झालेच नाही, असा दावा केला, पण पुरावे समोर आल्यानंतर झारखंडचे अन्न व नागरी पुरवठामंत्री सरयू राय स्थानिक अधिकाºयांवर खापर फोडले. मात्र, या प्रकारामुळे राज्यातील वातावरण तापू लागल्याने, मुख्यमंत्री रघुबर दास यांनीही चौकशी करून २४ तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.रेशन दुकानातून धान्य न मिळाल्याने संपूर्ण कुटुंबच काही दिवस उपाशी होते. संतोषी कुमारी ही ११ वर्षांची मुलगी शेवटच्या क्षणापर्यंत मला काहीतरी खायला द्या, अशी विनवणी करीत होती, पण घरात धान्य नसल्याने तिला काहीच खायला मिळाले नाही आणि ती उपासमारीने मरण पावली. तिची आई कोयलीदेवी म्हणाली की, मी रेशनच्या दुकानावर तांदूळ आणायला गेले होते. मात्र, रेशन कार्ड आधारला न जोडल्याने तुम्हाला रेशन मिळणार नाही, असे दुकानदाराने सांगितले. दिवसभर काहीच खायला न मिळाल्याने संतोषीचे पोट खूप दुखत होते. तिच्या पोटात अन्नाचा कण नव्हता. २४ तासांहून अधिक काळ ती उपाशी होती आणि मला भात खायला द्या, असे ती सांगत होती. तसे म्हणतच तिने जीव सोडला. (वृत्तसंस्था)कारवाई व्हायलाच हवीहा प्रकार उघडकीस येताच, सरकारवर सर्व बाजूंनी टीका सुरू झाली आहे. अन्न व नागरीपुरवठामंत्री सरयू राय म्हणाले की, आधार कार्ड नसले, तरी लोकांना रेशन द्या, असे स्पष्ट आदेश आपण यापूर्वीच दिले होते. संबंधितांची ओळख पटवून त्यांना धान्य द्या, अशा सूचना आहेत.रेशन कार्ड आधारशी न जोडल्याने अडवणूक झाली असेल, मुलीचा मृत्यू झाला असेल, तर संबंधितांविरुद्ध कारवाई व्हायलाच हवी. सरकारने काही महिन्यांपूर्वी रेशन दुकानांमधून आधार कार्ड व ठशांच्या आधारे सर्व रेशन कार्डधारकांना धान्य देण्याचा निर्णय घेतला होता.
झारखंडमध्ये उपासमारीमुळे लहान मुलीचा झाला मृत्यू , दुकानाने दिला धान्य देण्यास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 1:50 AM