- ऑनलाइन लोकमत
निमच, दि. 5 - जिवंत असताना सर्व सुखसोयी अनुभवायच्या असतील तर पैसा अत्यंत गरजेचा असतो. खिशात पैसा नसेल तर आपली काहीच किंमत नसते, पण हाच पैसा मृत्यूनंतरही आपला पाठलाग सोडत नाही. असाच अनुभव देणारी एक घटना इंदोरपासून 275 किमी अंतरावर असणा-या रतनगड गावात घडली आहे. पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधी करण्यासाठी खिशात पैसे नसल्याने एका आदिवासी व्यक्तीला कच-याच्या ढिगा-यात मृतदेह जाळावा लागल्याची घटना घडली आहे.
जगदीश भील असं या व्यक्तीचं नाव आहे. जगदीशकडे साधं लाकूड खरेदी करण्यासाठीही पैसे नव्हते. तीन तास तो कचरा जमा करत होता. शेवटी कच-याची चिता रचून त्याच्यावर पत्नीला मुखाग्नि दिला. पंचायतनेदेखील काहीच मदत न केल्याने जगदीशवर ही वेळ ओढवली. एका व्यक्तीने तर जगदीशला पत्नीचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत भरुन नदीत फेकून देण्याचा सल्लाही देऊन टाकला. ही घटना शुक्रवारी घडली आहे, मात्र रविवारी समोर आली जेव्हा संपुर्ण जग दीनदुबळे, निराधारांसाठी काम करून जगात आदर प्राप्त केलेल्या मदर तेरेसा यांना संतपद बहाल झाल्याचा आनंद साजरा करत होतं.
'माझी पत्नी नोजीबाईचं शुक्रवारी सकाळी निधन झालं. अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्यासाठी लाकूड लागणार होते, त्यासाठी मी रतनगडला गेलो होतो. पण ग्रामसचिवांनी मदत करण्यास नकार दिला. तेव्हा सकाळचे 10 वाजले होते. नगरसेवक नथुलाल यांच्याकडून मला मदतीची अपेक्षा होती. पण ते गावाबाहेर गेले होते, कोणी माझं फोनवरुन त्यांच्याशी बोलणंही करुन दिलं नाही', असं जगदीश भील यांनी सांगितलं आहे.
अनेक लोक शेजारुन गेले पण मदतीला कोणीच थांबलं नाही. शेवटी जगदीश आणि त्याच्या मित्रांनी कचरा जमा केला. आपली पत्नी घर चालवण्यासाठी लाकूड जमा करायची, मात्र तिचा मृत्यू झाला तेव्हा साधं चिता रचण्यासाठी लाकूड नाही याचं जगदीशला दुख: वाटत होतं.
'शेवटी हार मानून मृतदेह पुरण्याचं ठरवण्यात आलं. पण एका सामाजिक कार्यकर्त्याने आमच्याशी संपर्क साधला, लाकूड आणि काही गोष्टी त्यांनी मिळवून दिल्या ज्यानंतर आम्ही चिता जाळली', असं जगदीश यांनी सांगितलं आहे. सर्व झाल्यावर अधिका-यांची टीम पोहोचली. त्यांनी लाकूड पाठवलं होतं मात्र तोपर्यंत चिता जळाली होती.