निमच : जिवंत असताना सुखसोयींसाठी पैसा लागतो, असे म्हणतात. खिशात पैसा नसेल तर काहीच किंमत नसते. पण मृत्यूनंतरही पैशाची गरज भासतेच. तो नसला की, मृताचेही हालच होतात. अशीच एक घटना रतनगड गावात घडली. पत्नीचा मृत्यू झाला, तेव्हा तिनेही जिवंतपणी पैसे साठवले नसल्याचे आढळून आले आणि अंत्यविधी करण्यासाठी नवऱ्याच्या खिशातही पैसे नव्हते. त्यामुळे त्या आदिवासी व्यक्तीला पत्नीचा मृतदेह कचऱ्याच्या ढिगाऱ्यात जाळावा लागला. भिल्ल समाजाच्या या व्यक्तीचे नाव जगदीश भील आहे. आहे. जगदीशकडे सरणासाठी लागणारे लाकूड खरेदीसाठी पैसे नव्हते. त्यामुळे पत्नीचा मृतदेह जाळण्यासाठी तो तीन तास कचरा गोळा करीत राहिला आणि कचऱ्याच्या चितेतच त्याने पत्नीला अग्नी दिला. पंचायतीनेही त्याला अंत्यसंस्कारासाठी मदत केली नाही. गावातील एकाने जगदीशला पत्नीचा मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून नदीत फेकून देण्याचा सल्ला दिला. ही घटना आहे शुक्र वारची. मात्र रविवारी ती समोर आली. जगदीश म्हणाला : पत्नी नोजीबाईचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्यासाठी लाकूड लागणार होते. त्यासाठी मी रतनगडला गेलो होतो. पण ग्रामसचिवांनी मदत करण्यास नकार दिला. तेव्हा सकाळचे १0 वाजले होते. नगरसेवक नथुलाल यांच्याकडून मला मदतीची अपेक्षा होती. पण ते गावाबाहेर होते. त्यांच्याशी फोनवर बोलणे करून द्या, असे मी त्यांच्या निकटवर्तीयांना सांगितले. पण कोणी माझे त्यांच्याशी फोनवरु न बोलणेही करून दिले. अनेक जण पत्नीचा मृतदेह बघून जात होते. दु:ख व्यक्त करीत होते. पण मदतीला मात्र कोणीच थांबले नाही. अखेर जगदीश आणि त्याच्या काही मित्रांनी इथूनतिथून कचरा गोळा केला. त्याची पत्नी नोजीबाई स्वयंपाकासाठी लाकूडफाटा जमा करायची. पण तिचा मृत्यू झाला, तेव्हा चिता रचण्यासाठी लाकूड मिळू शकले नाही, याचे जगदीशला दुख: आहे. (वृत्तसंस्था) >कारवाई करणारही बातमी समजताच जिल्हाधिकाऱ्यांनी काही कर्मचाऱ्यांना तिथे घाईघाईने पाठवले. त्यांनी लाकूडफाटाही सोबत नेला होता. पण ते पोहोचेपर्यंत नोजीबाईचा मृतदेह जाळण्यात आला होता. निमचचे जिल्हाधिकारी रजनीश श्रीवास्तव यांनी या प्रकाराबद्दल खेद आणि संताप व्यक्त केला. ज्यांनी जगदीश भीलला मदत करण्यास टाळाटाळ केली, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले.
पैसे नसल्याने कचऱ्यात जाळला पत्नीचा मृतदेह
By admin | Published: September 06, 2016 4:09 AM