ऑनलाइन लोकमतइंदोर, दि. 23 - विमान उतरण्याच्या बेतात होते आणि सर्व प्रवासी आपापल्या आसनावर पट्टा बांधून बसले होते. अशा परिस्थितीत अचानक विमानातील सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणेवर राष्ट्रगीत सुरू झाले आणि प्रवाशांमध्ये एकच तारांबळ उडाली. विमान प्रवासादरम्यानच्या नियमांचे पालन करावे की, राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे राहावे, काय करावे? हे प्रवाशांना सुचेनासे झाले. हा प्रकार स्पाईस जेटच्या तिरुपती ते हैदराबाद या हवाई मार्गावरील विमानात घडला. अशा पंचाईतीला सामोरे जावे लागलेल्या प्रवाशांना एअर लाईन्सकडे तक्रार दिली आहे. स्पाईट जेटच्या या विमानातील (एसजी-1044) कर्मचाऱ्याने विमान उतरण्याच्या बेतात असताना राष्ट्रगीताची धून वाजविली. आता काय करावे, हे प्रवाशांना सुचेनासे झाले आणि बसल्या जागी पट्टा बांधून बसणे आम्हाला भाग पडले, असे पुनीत तिवारी या प्रवाशाने सांगितले. विमानातील अन्य एका कर्मचाऱ्याने मध्येच ही वाजणारी धून थांबविली आणि नंतर पुन्हा सुरू केली. पुनीत हे पत्नी आणि दीड वर्षाच्या मुलीसोबत या विमानाने प्रवास करीत होते. आमच्या कर्मचाऱ्याने चुकीच्या नंबरची धून निवडल्याने राष्ट्रगीताची धून सुरू झाली. तथापि ती तात्काळ बंद करण्यात आली. या प्रकारामुळे प्रवाशांची अडचण झाली. त्याबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो, अशी स्पाईस जेटच्या प्रवक्त्याने म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
विमानात लँडिंगदरम्यान राष्ट्रगीत सुरू झाल्यानं प्रवाशांची पंचाईत
By admin | Published: April 23, 2017 8:34 PM