नवी दिल्ली : गेल्या महिन्यात मान्सून अपुरा पडल्यामुळे खरीपासाठीच्या पेरणीचे क्षेत्र २७ टक्क्यांनी कमी होऊन २३४.२२ लाख हेक्टर्स झाले आहे, असे सरकारने दिलेल्या ताज्या आकडेवारीत म्हटले आहे. भारतीय हवामान खात्याने जुलै आणि आॅगस्ट महिन्यात चांगल्या पावसाचे भाकित केल्यामुळे येत्या दिवसांत पेरणीला चांगला वेग येईल अशी अपेक्षा आहे. शिवाय केंद्र सरकारने १४ खरीप पिकांच्या किमान हमी भावात लक्षणीय वाढही जाहीर केल्याचाही सकारात्मक परिणाम होणार आहे.
नैर्ऋत्य मान्सूनचे आगमन होताच खरिपाच्या पेरणीला प्रारंभ होतो, परंतु यंदा पावसाला उशिरा सुरुवात झाल्यामुळे पेरणीलाही विलंब झाला व पाऊसही ३३ टक्क्यांनी कमी झाला, असे हवामान खात्याची आकडेवारी सांगते.छत्तीसगड, उत्तर प्रदेश, हरियाणा, ओदिशा, मध्य प्रदेश, कर्नाटक, अरुणाचल प्रदेश, बिहार, आसाम, पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेशमध्ये व इतर काही राज्यांत ही खरिपाची कमी पेरणी झाल्याचे वृत्त आहे. तूर डाळ, उडद आणि मूग यांची पेरणी अवघ्या ७.९४ लाख हेक्टर्सच्याही खाली यंदा झालेली आहे.
गेल्या वर्षी ती २७.९१ लाख हेक्टर्सवर झालेली होती. भरड धान्याची ३७.३७ लाख हेक्टर्सवर पेरणी झाली असून, ती गेल्या वर्षी ५०.६५ लाख हेक्टर्सवर झालेली होती. कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगण, तमिळनाडू राज्यांत डाळींची लागवड कमी झालेली आहे.
तेलबियांचा विचार केला तर भुईमूग, सूर्यफूल आणि सोयाबीनची लागवड गेल्या आठवड्यापर्यंत ३४.०२ लाख हेक्टर्सवर झाली होती. तीगेल्या वर्षी ५९.३७ लाख हेक्टर्सवर झालेली होती. रोख पैसे देणाऱ्या पिकांत उसाची लागवड ५० लाख हेक्टर्सवर (गेल्या वर्षी ५१.४१ लाख हेक्टर्स) गेल्या आठवड्यापर्यंत झालेली आहे.भात लागवडही घटलीकृषी मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या आठवड्यापर्यंत २०१९-२०२० वर्षात खरीप हंगामात (जुलै ते जून) २३४.३३ लाख हेक्टर्सची पेरणी झालेली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ३१९.६८ लाख हेक्टर्सवर पेरणी झाली होती. खरिपातील मुख्य पीक भाताची लागवड गेल्या आठवड्यापर्यंत ५२.४७ लाख हेक्टर्सवर झाली होती. ती गेल्या वर्षी ती ६८.६० लाख हेक्टर्सवर झालेली होती.