'राफेल'मुळे बदनाम झालं छत्तीसगडमधलं एक गाव, सगळे उडवतात खिल्ली!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 03:46 PM2019-04-15T15:46:58+5:302019-04-15T15:48:31+5:30
छत्तीसगडच्या महासमुंदपासून १३५ किमी अंतरावर दुर्गम परिसरात असणाऱ्या या गावाचं नाव 'राफेल' असं आहे. देशात राफेल मुद्दा निवडणुकीतील प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा बनल्याने राफेल हे नाव गावकऱ्यांसाठी समस्येचे कारण बनलं आहे.
नवी दिल्ली - सध्या देशभरात आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलेला असताना निवडणुकीच्या रिंगणात सर्वात चर्चेत मुद्दा आहे तो म्हणजे राफेल. राफेल विमान खरेदी प्रकरणावरुन भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसमध्ये राजकीय वातावरण तापू लागलंय. काँग्रेसनेराफेल मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट केलं असून अनिल अंबानी यांना फायदा होण्यासाठीच हा करार करण्यात आल्याचा आरोप केला आहे. इतकचं नाही तर राफेलवरुन चौकीदार चोर है अशी मोहीमही काँग्रेसकडून सोशल मिडीयात उभारण्यात आली.
मात्र हा राफेल मुद्दा छत्तीसगडमधील एका गावासाठी मोठी समस्या बनला आहे. छत्तीसगडच्या महासमुंदपासून १३५ किमी अंतरावर दुर्गम परिसरात असणाऱ्या या गावाचं नाव 'राफेल' असं आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून देशात राफेल मुद्दा निवडणुकीतील प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा बनल्याने राफेल हे नाव गावकऱ्यांसाठी समस्येचे कारण बनलं आहे.
राफेल गावातील ग्रामस्थांचे म्हणणं आहे की, जेव्हापासून राफेल प्रकरणावरुन राजकीय वातावरण तापू लागलंय तेव्हापासून राफेल नावावरुन असलेल्या या गावाची आजूबाजूच्या गावांकडून खिल्ली उडविण्यात येत आहे. जर समजा भविष्यात काँग्रेस पक्ष सत्तेत आला आणि त्यांनी राफेलची चौकशी केली तर या गावावरही कारवाई केली जाईल असा विनोद शेजारील गावातील गावकरी करत आहेत. याचं कारणं काय तर काही दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाषणात म्हटलं की, काँग्रेस सत्तेत आल्यावर लगेच राफेलची चौकशी करु. अन् नेमकं या गावाचं नावचं राफेल आहे. त्यामुळे राफेलची चौकशी होणार म्हणजे या गावावर कारवाई केली जाणार अशाप्रकारे खिल्ली इतर ग्रामस्थ उडवत आहेत. राफेल हे गाव छत्तीसगड राज्यातील दुर्गम भागात आहेत त्यामुळे या गावाकडे अद्याप कोणाचंही लक्ष गेलं नाही. मात्र देशात सध्या लोकसभा निवडणुकीचं वारं वाहतंय त्यामुळे राफेल गाव सोशल माध्यमांमध्ये चर्चेत आलं आहे.
१९९८ च्या पूर्वी राफेल गाव छत्तीसगडच्या रायपूर जिल्ह्यात समाविष्ट होतं मात्र त्यानंतर महासमुंद या जिल्ह्यामध्ये गावाचा समावेश करण्यात आला. अतिशय दुर्गम भागात हे गाव असल्याने आत्तापर्यंत गावचा विकासच झाला नाही. राफेल ग्रामस्थ शेतीवर निर्भर असल्याने शेती पण पावसावर अवलंबून आहे. पंतप्रधान कोणीही बनो मात्र या गावात सिंचनाची व्यवस्था आली पाहिजे असं गावकऱ्यांचे म्हणणं आहे. निवडणूक मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात राफेल ग्रामस्थ मतदानासाठी जाणार आहेत. देशभरात राफेलवरुन भाजपा आणि काँग्रेसमध्ये रणकंदन माजलं असताना अद्यापपर्यंत या गावात ना भाजपाचा कोणी नेता आला ना काँग्रेसचा नेता प्रचारासाठी आला. जवळपास २०० कुटुंब या गावात वास्तव्यास आहे.
काँग्रेस सत्तेत आल्यावर राफेल गावावर कारवाई होणार असल्याचं शेजारील गावातील लोकं आमची खिल्ली उडवतात. आम्ही गावाचं नाव बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे गेलो मात्र आम्हाला त्यांची भेट झाली नाही असं या गावातील ग्रामस्थ धरम सिंग यांनी सांगितले. तसेच राफेल प्रकरणामुळे या गावाची नकारात्मक प्रसिद्धी झाली पण आमच्या गावाची चिंता कोणालाच नाही असंही ते बोलले.
महासमुंद विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपाचे चांदुल शाहू हे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्याच मतदारसंघात राफेल गावाचा समावेश होतो. राफेलवरुन भाजपा-काँग्रेसमध्ये दावे-प्रतिदावे होत असले तरी राफेल गाव मात्र विकास, जलसिंचन आणि मूलभूत सुविधांपासून वंचितच राहिलं हे सत्य कोणी नाकारु शकणार नाही.