ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 19 - ठरलेलं लग्न ऐनवेळी मोडण्यात आल्याचं आपण अनेकदा ऐकलं असेल. हुंडा मिळाला नाही म्हणून तर कधी लग्नात आईस्क्रीम मिळालं नाही म्हणून, तर चिकनऐवजी मटण वाढलं म्हणून लग्न मोडण्यात आल्याच्या घटना आजपर्यं
त समोर आल्या आहेत. पण या सर्वांवर कहर करणारी घटना समोर आली असून फक्त रसगुल्ल्यामुळे भर मंडपात लग्न मोडण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशात ही विचित्र घटना घडली आहे.
लखनऊपासून 70 किमी अंतरावर असलेल्या उन्नाओ जिल्ह्यातील कुरमापूर गावात ही घटना घडली आहे. नवरामुलगा वरात घेऊन मुलीच्या दारात पोहोचला असता सर्व विधी पार पाडत त्यांचं स्वागत करण्यात आलं. लग्नाचा मुहूर्त जरा उशिराचा असल्याने नवरदेवाच्या वडिलांनी कार्यक्रम संपताच पाहुणे मंडळींना जेवण वाढावं अशी विनंती केली होती.
दुसरीकडे नवरीमुलीच्या नातेवाईकांनी जेवणात एकच रसगुल्ला वाढावा असा आदेश दिला होता. आणि इथेच खरी समस्या सुरु झाली. नव-यामुलाच्या चुलत भावाने दोन रसगुल्ले घेतले आणि मुलीच्या नातेवाईकांना मधुमेहच झाला. रसगुल्ल्यामुळे भर मंडपात तिस-या महायुद्दालाच सुरुवात झाली होती. लग्न मंडपाचं रुपांतर युद्धभूमीत झालं होतं.
लग्न राहिलं बाजूला इथे अक्षरक्ष: मारामारी सुरु होती. नवरीमुलगी हे सगळं आपल्या बाल्कनीतून पाहत होती. आपल्या वडिलांवरही हात उचलले जात असल्याचं पाहून तिचा संताप झाला आणि तिने लग्न मोडून टाकलं. मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलीस सध्या तपास करत आहेत.