ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - रस्त्यावरील खड्डे व स्पीड ब्रेकर्स आता जीवघेणे ठरु लागले असून गेल्या वर्षभरात खड्डे व स्पीड ब्रेकर्समुळे देशभरात तब्बल ११ हजार ४०० जणांना जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्रात याच कारणामुळे मृत्यू झालेल्यांचे प्रमाण ३६८ एवढे आहे.
केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्रालयाने 'रस्ते अपघात अहवाल - २०१४' हा अहवाल नुकताच प्रकाशित केला असून या अहवालात पहिल्यांदाच खड्डे व स्पीड ब्रेकर्समुळे होणारे अपघात याचा सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे. २०१४ या वर्षात ११,४०० जणांचा स्पीड ब्रेकर व खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात मृत्यू झाला. यात सर्वात आघाडीवर उत्तर प्रदेश असून उत्तरप्रदेशमध्ये एका वर्षात तब्बल ४,४४५ जणांचा या कारणामुळे मृत्यू झाला आहे. त्याखालोखाल मध्य प्रदेश (९१५), बिहार (८६७) या राज्यांचा क्रमांक लागला आहे. रस्त्यांची योग्य देखभाल न करणे व नियम पायदळी तुडवून स्पीड ब्रेकर तयार केल्याचे परिणाम या अहवालातून उघड झाले आहेत. आता सरकारी यंत्रणांनी या तक्रारींकडे गांभीर्याने बघावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.