पावसाची हुलकावणी अल्प वेळ सूर्यदर्शन : उकाड्याचा त्रास, ढगाळ वातावरण
By admin | Published: June 19, 2016 12:17 AM
जळगाव : ढगाळ वातावरण असल्याने पाऊस येईल, अशी आशा सर्वांना होती, परंतु शनिवारी पावसाने सपशेल हुल दिली.
जळगाव : ढगाळ वातावरण असल्याने पाऊस येईल, अशी आशा सर्वांना होती, परंतु शनिवारी पावसाने सपशेल हुल दिली. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर म्हणजेच १.१३ वाजता शहर व लगतच्या परिसरात पाऊस आला. सुरुवातीला अगदी हलका पाऊस होता. नंतर तीन ते चार मिनिटांनी पावसाने काहीसा जोर धरला. परंतु फक्त १५ मिनिटे पाऊस आला. नंतर पाऊस बंद झाला. पहाटे अधून मधून पावसाचे थेंब पडत होते. तुरळक पाऊस होता. पहाटे तर जोरदार पाऊस येईल, अशी आशा होती. काळे ढग आकाशात जमा होत होते. गार वाराही सुटला होता. पाऊस येईल म्हणून सर्वत्र चैतन्याचे वातावरण होते. परंतु दिवसभर पाऊस आलाच नाही. पावसाळी वातावरण तयार झाल्याने मागील अनेक दिवसांपासून उकाडा व कडक उन्हाचा सामना करणार्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. उन्हापासून बचाव करण्यासाठी बागायदार रूमाल, गॉगलची गरज भासली नाही. उकाडा मात्र कायम होता. ढगाळ वातावरण दुपारी ४.२५ वाजता काहीसे कमी झाले. सुमारे १२ ते १५ मिनिटे धूसर ऊन पडले. नंतर पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले. रात्रीपर्यंत ढगाळ वातावरण आणि उकाड्याची स्थिती कायम होती. दिवसभर उपनगरांमध्ये अधून मधून वीजपुरवठाही खंडित होत होता. रात्री जिल्हा पेठ भागात दोनदा वीज बंद झाली. पाऊस येईल म्हणून बाजारपेठेत विक्रेत्यांमध्येही चैतन्य होते. अनेक हातगाडीधारकांनी ताडपत्री आणल्या होत्या. तसेच बाजारपेठेत ताडपत्री, छत्र्या आदींच्या खरेदीसाठीही गर्दी झाली. पण पाऊस न आल्याने सर्वांचा हिरमोड झाला.