ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 25 - गेल्या सात वर्षांपासून पाण्याचा एक थेंबही न घेतलेल्या आठ वर्षाच्या चिमुरडीला पाणी पाजण्यात डॉक्टरांना यश मिळालं. वाडिलाल साराबाई रुग्णालयाने ही दुर्मिळ सर्जरी करत या चिमुरडीला पाणी पाजलं. या सर्जरीला "गॅस्ट्रिक पूल - अप विथ एसोफेजिअल रिकन्स्ट्रक्शन" असं म्हटलं जातं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार गॅस्ट्रिक पूल अपच्या माध्यमातून पोटाला खेचून छातीपर्यंत आणलं जातं, आणि त्यानंतर त्याला अन्ननलिकेने जोडलं जातं.
नेहा रामप्रकाश नावाच्या या मुलीवर ही सर्जरी करण्यात आली. नेहा उत्तरप्रदेशच्या मऊ जिल्ह्याची रहिवासी आहे. जेव्हा ती फक्त दिड वर्षांची होती तेव्हा तिने नजरचुकीने अॅसिड प्यायलं होतं. त्यावेळी तिला पाईपच्या सहाय्याने अन्न आणि पाणी दिलं जात होतं. पाईप तिच्या आतड्यांमध्ये घुसवण्यात आला होता.
नेहाचे आई - वडिल मजूर आहेत. त्यांनी नेहाला उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील रुग्णालयांमध्ये खूप धावपळ केली, पण काहीच मदत मिळाली नाही.
या महिन्याच्या सुरुवातीला नेहाचे आई - वडिल वाडिलाल साराबाई रुग्णालयातील गॅस्ट्रोसर्जरी विभागात पोहोचले. यावेळी डॉक्टरांनी तपासणी केली असताना तिच्या शरिरातील अनेक भाग खराब झाल्याचं लक्षात आलं. यानंतर डॉक्टरांनी सर्जरी करत एक पाईप तयार करत त्याला अन्ननलिकेशी जोडलं. यामुळे नेहाला भविष्यात पाणी पिताना आणि जेवताना काही त्रास होणार नाही.