नवी दिल्ली- जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील दहा विद्यार्थ्यांना दिल्लीत सुरु असलेल्या एनसीसी कॅम्पमधून हाकललं असल्याचा प्रकार समोर आला आहे. दिल्लीच्या रोहिणी परिसरात एनसीसीचे हे शिबीर सुरू आहे. दाढी काढायला नकार दिल्यामुळे या विद्यार्थ्यांना कॅम्पमधून बाहेर काढल्याची माहिती समोर येते आहे. सहा दिवसांसाठी हे विद्यार्थी कॅम्पसाठी आले होते. कॅम्पमधील बटालियन हवलदार मेजरने 19 डिसेंबर रोजी त्यांना दाढी काढायला सांगितली. शिबीर सुरू असताना अचानकपणे दाढी काढण्याचा आदेश देण्यात आल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. शिस्तीचं कारण पुढे करत आम्हाला दाढी काढायला सांगितली. आम्ही दाढी काढायला नकार दिल्यानंतर आम्हाला शिबिरातून हाकलवून देण्यात आलं, असा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
शिबिराच्या पहिल्याच दिवशी अर्ज भरताना दाढीला आमच्या समाजात धार्मिक महत्त्व आहे, ही बाब आम्ही नमूद केली होती. याबद्दल आक्षेप असेल तर आम्हाला तसं सांगा असं आम्ही अर्ज भरताना स्पष्ट केलं होतं. तेव्हा कोणीही याबद्दल काहीच बोललं नाही. शिबिराच्या सहाव्या दिवशी अचानकपणे अधिकाऱ्यांनी आम्हाला दाढी काढून टाका किंवा शिबिर सोडून जा, असं सांगितलं. अशी माहिती दिलशाद अहमद या विद्यार्थ्याने दिली.
विद्यार्थी मोहम्मद हमजा याने सांगितलं की, तीन वर्षापासून आम्ही एनसीसीचा भाग आहोत. तसंच आर्मी अटॅचमेंट कॅम्पलाही जाऊन आलो आहे. पण त्यांना तधीही दाढी ठेवण्यावरून हटकण्यात आलं नाही. एनसीसीच्या एका माजी अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, कॅम्पमध्ये दाढी ठेवायला मंजुरी नाही. त्यासाठी हायकोर्ट आणि संरक्षण मंत्रायलातूनही आदेश मिळाले आहेत .कॅम्पमध्ये आम्हाला मिळालेली वागणूक अतिशय अमानास्पद होती. आम्ही पोलीस कारवाईची मागणी केली. तेथे उपस्थित असलेल्या कुणीही आमची मदत केली नाही, असं अनवर आलम या विद्यार्थ्याने म्हंटलं.
शिबिरातील अधिकारी कर्नल बी.एस. यादव यांनी याप्रकरणावर प्रतिक्रिया द्यायला नकार दिला. विद्यार्थ्यांबरोबर असलेल्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूंना ते या प्रकरणाचा रिपोर्ट देणार आहेत. या प्रकरणाचा तपास केला जाणार असल्याचं युनिव्हर्सिटीच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं.
दरम्यान, 2013 मध्ये बंगळुरूमध्ये कॉलेजचे 7 विद्यार्थ्यांनी एनसीसीच्या निर्णयाविरोधात कर्नाटक हायकोर्टात याचिका दाखल केली होती. दाढी ठेवल्यामुळे एनसीसीने परीक्षेला बसू दिलं नाही, असा आरोप या विद्यार्थ्यांनी केला.