बंगळुरू - भाजपाला हुलकावणी देत कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करणाऱ्या जेडी (एस) आणि काँग्रेसमध्ये सुरुवातीपासून सारे काही आलबेल नसल्याचे वृत्त येत होते. काही दिवसांपूर्वीच आघाडी सरकारमधील अडचणींचा पाढा वाचत कुमारस्वामी भावूक झाल्याचेही साऱ्यांनी पाहिले होते. आता कर्नाटक सरकारमधील नेत्यांमधील दरी पुन्हा एकदा समोर आली असून, माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या पत्रप्रपंचामुळे मुख्यमंत्री कुमारस्वामी त्रस्त झाले आहेत. सिद्धारामय्या यांच्या या पत्रांमुळे कुमारस्वामी यांचे वडील आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या माजी मुख्यमंत्री धरमसिंह यांच्याविरोधातील लेटर वॉरच्या आठवणी नव्याने जाग्या झाल्या आहेत. कुमारस्वामी यांच्या जेडी (एस) काँग्रेस आघाडीच्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे स्वीकारल्यापासून सिद्धारामय्या यांनी कुमारस्वामी आणि त्यांच्या मंत्र्यांना समस्यांचा पाढा वाचणारी पत्रे पाठवण्याचा धडाका लावला आहे. सिद्धारामय्यांनी कुमारस्वामी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना 9 पत्रे पाठवली आहेत. यापैकी बहुतांश पत्रांमध्ये सिद्धारामय्या यांनी त्यांच्या बदामी या मतदारसंघातील समस्यांचा पाढा वाचला आहे. तसेच खनिज तेलावरील कर वाढवण्याच्या तसेच पीडीएस-बीपीएल कुटुंबीयांसाठी देण्यात येणाऱ्या तांदळाच्या पुरवठ्यात घट करण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी सिद्धारामय्या यांनी केली आहे. सिद्धारामय्या यांच्या या पत्रांमुळे कुमारस्वामी चांगलेच त्रस्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आघाडी सरकार चालवतानाच्या अडचणींचा पाढा वाचला होता. दरम्यान, कुमारस्वामी यांना डिवचण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी सिद्धारामय्या हा पत्रप्रपंच करत असल्याचे मत राजकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.
निंद न आए, चैन न आए... सिद्धरामय्यांनी उडवलीय कुमारस्वामींची झोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 3:59 PM