लखनौ : पंतप्रधान मोदी यांच्याबाबत विधिमंडळ कामकाजमंत्री आजम खान यांनी केलेले आक्षेपार्ह वक्तव्य कामकाजातून वगळण्याच्या मागणीसाठी भाजपा सदस्यांनी प्रचंड गोंधळ घातल्यामुळे उत्तर प्रदेश (यूपी) विधानसभेचे कामकाज मंगळवारी काही काळ स्थगित करण्यात आले. प्रश्नोत्तराच्या तासात सभागृहात कायदा आणि सुव्यवस्थेवरील चर्चेदरम्यान आजम खान यांनी मोदी यांच्यावर निशाणा साधला. खान यांच्या टीकेतील काही वक्तव्ये जिव्हारी लागल्यामुळे संतप्त भाजपा सदस्य सभागृहाच्या मधोमध आले आणि त्यांनी ही विधाने कामकाजातून वगळण्याची मागणी केली. आजम खान यांची ही विधाने मोदी यांच्या वैयक्तिक आयुष्यासंबंधीची होती. त्यामुळे भाजपा सदस्यांनी जोरदार घोषणा देत गोंधळ घातला. खान म्हणाले, आमचे पंतप्रधान पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना तेथे कोण कोण उपस्थित होते हे देश जाणून घेऊ इच्छितो. विधानसभा अध्यक्ष माता प्रसाद पांडेय यांनी या विधानांबाबत लक्ष घालू, असे आश्वासन दिले, पण त्याचा उपयोग झाला नाही. (वृत्तसंस्था)
मोदींबाबत विधानामुळे यूपी विधानसभेत गोंधळ
By admin | Published: August 31, 2016 4:12 AM