ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - पंजाबमधील पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असताना रविवारी सकाळी दिल्ली-कानपूर मार्गावर धावणारी ट्रेन बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यामुळे उत्तर भारतातील रेल्वे स्थानकांवर एकच खळबळ उडाली.
मुंबईच्या दहशतवाद विरोधी पथकाला ई-मेलवरुन दिल्ली-कानपूर मार्गावरील ट्रेन बॉम्ब स्फोटामध्ये उडवून देण्याची धमकी मिळाली. मुंबई एटीएसने तात्काळ रेल्वे बोर्डाला याची माहिती दिली. त्यानंतर दिल्ली-लखनऊ शताब्दी एक्सप्रेस गाझियाबाद येथे थांबवण्यात आली. सर्व प्रवाशांना ट्रेनमधून उतरवून ट्रेनची तपासणी करण्यात आली. मात्र ट्रेनमध्ये कुठेही बॉम्ब सापडला नाही. त्यानंतर ट्रेनला मार्गस्थ करण्यात आले.
नवी दिल्ली रेल्वे स्थानकातही कसून तपासणी करण्यात आली. तात्काळ श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. धुक्यांमुळे आधीच ट्रेन उशिराने धावत असताना अचाकनपणे झालेल्या सुरक्षातपासणीमुळे दिल्ली-कानपूर मार्गावरील ट्रेनना विलंब झाला आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकात सुरक्षाबंदोबस्त वाढवण्यात आला आहे.