पुड्डुचेरी/चेन्नई : फेंगल चक्रीवादळामुळे शनिवारी सायंकाळपासून दक्षिणेत अनेक भागांत पाऊस सुरू झाला असून, हे वादळ पुदुच्चेरीजवळ स्थिरावले आहे. या वादळाच्या परिणामी सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे पुदुच्चेरीत जनजीवन विस्कळीत झाले आहे. चक्रीवादळ कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतरीत झाले असून त्यामुळे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
रविवारी रात्रीपर्यंत या वादळाचा जोर ओसरेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. वादळामुळे तामिळनाडूतही अनेक भागांत पाऊस सुरू असून, चेन्नईत अनेक विमानसेवा रविवारीदेखील प्रभावित हाेती. (वृत्तसंस्था)
वादळाचे लँडिंग आणि पाऊस
शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता वादळ पुदुच्चेरीजवळ धडकले. रात्री साडेअकरापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झाली. या वादळाचा जोर आता ओसरत असून, यादरम्यान पुदुच्चेरीत २४ तासांत ४६ सेंमी पावसाची नोंद झाली आहे.
तामिळनाडूत विल्लूपुरम जिल्ह्यात ९ तासांत ५० सेंमी पाऊस पडला. काही स्थानिक ज्येष्ठ नागरिकांनुसार सुमारे ३० वर्षांनंतर पुड्डुचेरीत पाऊस किंवा वादळामुळे अशी गंभीर परिस्थिती उद्भवली आहे.
एनडीआरएफ, एसडीआरएफची मदत
पावसामुळे रस्तेे, वसाहती जलमय झाल्याने अनेक भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पूरग्रस्तांसाठी मदत शिबिरांत पूरग्रस्तांना अन्न पुरवण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. स्थानिक प्रशासन, पोलिस, लष्करासह विशेष बचाव पथकांचा बचावकार्यात सहभाग आहे.
वसाहती जलमय, वृक्ष उन्मळून पडले
nफेंगल चक्रीवादळामुळे सुरू झालेल्या मुसळधार पावसाने पुड्डुचेरीत अनेक वसाहती जलमय झाल्या असून, यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
nशनिवारी रात्रीपासून बहुतांश भागांत
वीजपुरवठा खंडित असून, पाण्यामुळे लोक घरातच अडकून पडले आहेत.
nअनेक घरांत पाणी शिरले असून, पार्किंगमध्ये लावलेली वाहने पाण्यात आहेत. वादळी वाऱ्यांमुळे अनेक भागांत वृक्ष उन्मळून पडले आहेत.
nसुमारे ५० हजार नागरिक प्रभावित झाले आहेत. त्यांना अन्न व इतर जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी दिली.