इम्फाळ : मणिपूरमध्ये सुरू असलेल्या वांशिक संघर्षाचा मोठा फटका तेथील शालेय विद्यार्थ्यांनाही बसला आहे. सुमारे १४ हजार शालेय विद्यार्थ्यांना मणिपूरमधील स्थितीमुळे विस्थापित व्हावे लागले आहे. ही माहिती केंद्रीय शिक्षण खात्याच्या राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी दिली.
यासंदर्भात राज्यसभेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, विस्थापित झालेल्या १४,७६३ शालेय विद्यार्थ्यांपैकी ९३.५ टक्के मुलांना त्यांच्या गावापासून जवळच असलेल्या दुसऱ्या शाळांमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवेशात कोणत्याही अडचणी येऊ नयेत याकरिता प्रत्येक निवारा छावणीत एका विशेष अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. या मुलांना शालेय प्रवेश देताना कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नाही.
रिकाम्या घरांना लावली आग इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील एका गावात विशिष्ट समुदायाच्या दोन रिकाम्या घरांना अज्ञात व्यक्तींनी बुधवारी पहाटे आग लावली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग विझविली. गेल्या दोन महिन्यांत झालेल्या हिंसाचारात १६०हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.