शामली, उत्तर प्रदेश - शाळेजवळच्या साखर कारखान्यातून बाहेर पडलेल्या रासायनिक कचऱ्यापासून बनलेल्या वायूमुळे तब्बल 300 विद्यार्थी आजारी पडले आहेत. सरस्वती शिशू मंदीरचे हे विद्यार्थी असून त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शेकडो मुलांना अस्वस्थ वाटायला लागलं, पोटदुखीचा त्रास झाला तर अनेकांना चक्कर आली. या मुलांपैकी जवळपास 35 मुलं गंभीर आजारी असल्याचं सांगण्यात येतंय. प्रकृती गंभीर झालेल्या काही मुलांना मीरतच्या मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
जवळपास 30 ते 35 मुलांचा आजार बळावला असून 15 जणांना मीरतला हलवण्यात आल्याचं जिल्हा प्रशासकीय अधिकारी सुरजीत सिंह यांनी सांगितलं. बहुसंख्य मुलांना गंभीर आजार झालेला नसल्याची चांगली बातमी डॉक्टरांनी दिली आहे. परंतु, मुलांच्या पालकांमध्ये व शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण असून परिस्थिती तणावपूर्ण आहे.
अनेक मुलांवर रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत. साखर कारखान्यातील कचरा एका उघड्या जागेत टाकण्यात आला. ही जागा शाळेपासून जवळच आहे. या कचऱ्यातून वायू उत्सर्जन झाले जे विषारी होते. या वायुची लागण झालेल्या मुलांना त्रास झाला आहे. ज्यावेळी मुलं या भागातून शाळेत जात होती, त्याचवेळी हा कचरा जाळण्याचं काम सुरू करण्यात आलं आणि त्यामुळं ही मुलं या विषारी वायुच्या तावडीत सापडली.
काही मुलं तर बेशुद्ध पडली तर काहीजण शाळेत पोचल्यावर आजारी पडली. शेकडो मुलं वायुची लागण झाल्यामुळे चक्कर येऊन पडली. शिक्षकांनी तातडीने या मुलांना रुग्णालयात हलवले.